ऑनलाईन टीम / मुंबई :
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रविवारी सायंकाळच्या वेळेस पोटात दुखू लागल्याने त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले आहे. मात्र, आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. तसेच हा किरकोळ त्रास असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. मात्र, यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत पवार साहेब लवकर बरे व्हा, अशा आशयाचे भावनिक ट्विट केले आहे.
रोहित पवार आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, ‘आदरणीय पवार साहेब कोणताही त्रास तुमच्यासाठी किरकोळ असला तरी आमच्यासाठी तो मोठा असतो. लवकर बरं व्हा!’, सर्वांच्या सदिच्छा तुमच्यासोबत आहेत! तुम्ही लवकर बरे व्हावेत म्हणून श्री. विठुरायाच्या चरणी प्रार्थना करतो ! असे म्हटले आहे.
शरद पवार यांच्या प्रकृतीची माहिती समोर आल्यानंतर राजकीय नेत्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांची प्रकृती लवकर बरी होण्यासाठी प्रार्थना केली आणि सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, प्रकृती बिघडल्यानंतर पवारांनी पहिल्यांदाच ट्वीट केले असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज ठाकरे, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन आणि लता मंगेशकर यांचे आभार मानले आहेत.
‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझ्या प्रकृतीसंदर्भात अत्यंत आस्थेने विचारपूस केली. त्यांच्या सदिच्छा या महाराष्ट्राच्या प्रातिनिधिक भावना आहेत. मनपूर्वक आभार!,’ असे पवारांनी म्हटले आहे.
त्याचबरोबर ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांनी माझ्या प्रकृती स्वास्थ्यासाठी सदिच्छा व्यक्त करत आस्थेने चौकशी केली. त्यांचे मनापासून आभार!, अशा शब्दात पवारांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.