55 लाख निधी मंजूर : ओरोस फोटा ते पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत फूटपाथ
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
सिंधुदुर्गनगरीमध्ये रस्ता डांबरीकरणाची कामे झाल्यानंतर आता ओरोस फाटा ते पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत फूटपाथ बांधकामाचे काम मंजूर करण्यात आले आहे. यासाठी 55 लाख 64 हजाराचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. मात्र फूटपाथ बांधत असताना सिंधुदुर्गनगरीत अनेक वर्षांपासून सुरू असलेले स्टॉल हटवावे लागणार आहेत.
माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सिंधुदुर्गनगरी जिल्हा मुख्यालय निर्मितीच्या 25 वर्षपूर्तीनिमित्त 25 कोटीचा निधी मंजूर केला आणि त्यापैकी 9 कोटीचा निधीही प्राप्त झाला. या निधीतून सिंधुदुर्गनगरीतील सर्व मुख्य रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले. त्यानंतर रस्त्यालगत फूटपाथ बांधकामाचे काम मंजूर करण्यात आले आहे. तसेच पथदिव्यांच्या नूतनीकरणाचे कामही सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे पथदिव्यांनी पुन्हा एकदा सिंधुदुर्गनगरी विद्युत रोषणाईने झळकणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय ते जिल्हा रुग्णालय असा फूटपाथ यापूर्वीच झाला आहे. त्यानंतर आता ओरोस फाटा ते जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत तीन फूट रुंदीचे फूटपाथ बांधले जाणार आहेत. त्यासाठी 55 लाख 65 हजाराचा निधी मंजूर होऊन 45 लाखाची निविदा प्रक्रियाही झाली आहे. त्यामुळे लवकरच फूटपाथचे काम होणार आहे.
दरम्यान फूटपाथ बांधत असतानाच प्रशासकीय कार्यालयांच्या कंपाऊंड वॉलच्या बाहेर अनेक वर्षांपासून स्टॉल उभारलेले आहेत. त्याच ठिकाणी फूटपाथ बांधले जाणार आहेत. त्यामुळे फूटपाथ बांधताना आता स्टॉल हटवावे लागणार आहेत. आता स्टॉलधारकांच्या पुनर्वसनाबाबत जिल्हाधिकारी काय भूमिका घेणार, याची उत्सुकता आहे.