नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य जिंकणाऱया पीव्ही सिंधूचे खास अभिनंदन केले. सिंधूचा भारताला अभिमान आहे. सिंधू भारताच्या दिग्गज ऑलिम्पियनपैकी एक आहे, असे ट्वीट मोदी यांनी यावेळी केले.
विद्यमान वर्ल्ड चॅम्पियन पीव्ही सिंधू ही दोन ऑलिम्पिक पदके जिंकणारी पहिलीच भारतीय महिला ऍथलिट ठरली. यापूर्वी 2016 रिओ ऑलिम्पिकमध्ये तिने रौप्यपदकाची कमाई केली होती.
सिंधूच्या पदकानंतर देशभरात जल्लोष
पीव्ही सिंधूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कांस्य जिंकल्यानंतर अवघ्या देशभरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. क्रीडामंत्री अनुराग ठाकुर यांनी स्मॅशिंग व्हिक्टरी पीव्ही सिंधू, असे ट्वीट करत तिचे अभिनंदन केले. तू सामना आणि इतिहास दोन्ही गाजवला, असे ते पुढे म्हणाले.
भारताचा वैयक्तिक गटातील एकमेव ऑलिम्पिक सुवर्णजेता नेमबाज अभिनव बिंद्राने सिंधूचे खास अभिनंदन केले. शिवाय, तिच्या कामगिरीचा देशवासियांना अभिमान असल्याचे नमूद केले. सिंधूने नवा इतिहास घडवला, असे ट्वीट अव्वल मल्ल बजरंग पुनियाने केले. मुख्य राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक पुलेला गोपीचंद, माजी कर्णधार अनिल कुंबळे, व्हीव्हीएस लक्ष्मण, वेटलिफ्टर करणम मल्लेश्वरी, स्पीडस्टार इशांत शर्मा, तसेच, बीसीसीआयने देखील ट्वीटद्वारे सिंधूचे अभिनंदन केले.