इंडिया ओपन बॅडमिंटन :रशियाच्या कोसेत्स्कायाला पराभवाचा धक्का, लोह यू विजयी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताची युवा बॅडमिंटनपटू अश्मिता छलिहाने येथे सुरू झालेल्या इंडिया ओपन 250 बॅडमिंटन स्पर्धेत पहिल्याच दिवशी धक्कादायक निकाल नोंदवताना पाचव्या मानांकित रशियाच्या एवगेनिया कोसेत्स्कायाचा पराभव केला. अग्रमानांकित पीव्ही सिंधू व किदाम्बी श्रीकांत यांनीही आपापले सामने जिंकून दुसरी फेरी गाठली.
विद्यमान वर्ल्ड चॅम्पियन लोह कीन यू याला विजयासाठी तीन गेम्समध्ये संघर्ष करावा लागला तर श्रीकांतने प्रतिस्पर्ध्यावर सहज विजय मिळवित पुरुष एकेरीची दुसरी फेरी गाठली. लोहने कॅनडाच्या झिओडाँग शेंगवर 16-21, 21-4, 21-13 अशी मात केली तर श्रीकांतने माजी कनिष्ठ जागतिक अग्रमानांकित सिरिल वर्माचा 21-17, 21-10 असा पराभव केला. चिराग सेनचे आव्हान मात्र पहिल्याच फेरीत समाप्त झाले. त्याला मलेशियाच्या सूंग जू व्हेनने 21-8, 21-7 असे हरविले.
तत्पूर्वी, सकाळच्या सत्रात महिला एकेरीत बिगरमानांकित अश्मिता छलिहाने रशियाच्या जागतिक क्रमवारीतील 28 व्या मानांकित कोसेत्स्कायाचा 24-22, 21-16 तर दोन ऑलिम्पिक पदके मिळविणाऱया सिंधूने आपल्याच देशाच्या श्री कृष्णा प्रिया कुदरावल्लीवर 21-5, 21-16 अशी मात केली. अश्मिताने पहिल्या गेममध्ये शानदार सुरुवात करीत ब्रेकपर्यंत 11-5 अशी आघाडी घेतली. पण ब्रेकनंतर तिच्याकडून अनेक चुका झाल्याने कोसेत्स्कायाने त्याचा लाभ घेत 14-14 वर तिला गाठले आणि नंतर 16-19 अशी पिछाडी भरून काढत पहिला गेमपॉईंट मिळविला. मात्र अश्मिताने अप्रतिम प्रदर्शन करीत कोसेत्स्कायाला चुका करण्यास भाग पाडले आणि दोन गेमपॉईंट्स वाचवत नंतर एका अप्रतिम स्मॅशवर गेमही जिंकला. दुसऱया गेममध्येही अश्मिताने जोम कायम राखत ब्रेकपर्यंत 11-4 अशी बढत घेतली. पण रशियन खेळाडूने ती 19-16 अशी कमी केली. अश्मिताने यावेळी संयमी खेळ करीत नियंत्रण मिळविले आणि हा गेम जिंकून सामना 31 मिनिटांत संपवला. अश्मिताची पुढील लढत फ्रान्सच्या येली होयॉशी होणार आहे. होयॉने भारताच्या रिया मुखर्जीचा 21-14, 21-13 असा पराभव केला. सिंधूची पुढील लढत इजिप्तची हनी दोहा व भारताची इरा शर्मा यापैकी एकीशी होईल.
श्रीकांतची पुढील लढत डेन्मार्कच्या किम ब्रुनशी होईल. बुनने भारताच्या शुभंकर डे याचा 21-19, 18-21, 21-14 असा पराभव केला. मिश्र दुहेरीत के.साई प्रतीक व गायत्री गोपीचंद यांनी इशान भटनागर व तनिशा कॅस्ट्रो यांचा 21-16, 16-21, 21-17 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली. पुरुष दुहेरीत इंडोनेशियाच्या मोहम्मद एहसान व हेंद्रा सेतियावन या अग्रमानांकित जोडीने विजयी सुरुवात करताना भारताच्या प्रेम सिंग चौहान व राजेश वर्मा यांचा 21-18, 21-10 असा पराभव केला.