पाकिस्तानच्या रुग्णालयात घडलेला प्रकार जाणून घेतल्यावर हैराण व्हाल. येथे एका सिक्युरिटी गार्डने स्वतःला डॉक्टर ठरवून महिलेवर शस्त्रक्रिया केली आहे. शस्त्रक्रियेच्या दोन आठवडय़ांनी महिलेची प्रकृती बिघडू लागल्यावर या धक्कादायक प्रकाराचा खुलासा झाला आहे. संबंधित महिलेचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. यादरम्यान शस्त्रक्रिया करणारा डॉक्टर नव्हे तर सिक्युरिटी गार्ड होता असे तिच्या कुटुंबीयांना कळले आहे.
पाकिस्तानच्या लाहोर येथील मेयो हॉस्पिटलमधील ही घटना आहे. येथे शमीमा बेगम नावाची 80 वर्षीय महिला पाठीवर झालेल्या जखमेवर शस्त्रक्रिया करवून घेण्यासाठी दाखल झाली होती. शस्त्रक्रिया झाली पण ती डॉक्टरने नव्हे तर रुग्णालयातील सिक्युरिटी गार्डने केली आहे.
आरोपीचे नाव मोहम्मद वहीद बट आहे. त्याने महिलेसमोर स्वतःला डॉक्टर संबोधिले होते. आश्चर्याची बाब म्हणजे वहीदने ऑपरेशन थिएटर आणि तेथील वैद्यकीय उपकरणांचाही वापर केला आहे.
हे अत्यंत मोठे रुग्णालय असल्याने आम्ही प्रत्येकक्षणी कोण काय करतंय याची माहिती ठेवू शकत नाही. कोण सिक्युरिटी गार्ड आहे आणि कोण डॉक्टर हे शोधणे अवघड असल्याची प्रतिक्रिया रुग्णालयाच्या एका पदाधिकाऱयाने दिली आहे. महिलेच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांना प्रकरणाचे सत्य समजल्यावर त्यांना धक्काच बसला. संबंधित सिक्युरिटी गार्डला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या सिक्युरिटी गार्डने यापूर्वी देखील असे प्रकार केले असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.