प्रतिनिधी / पणजी
खोर्ली मतदार संघाचे जिल्हा पंचायत सदस्य श्री. सिद्धेश नाईक यांच्या पुढाकाराने 18 ते 40 या वयोगटातील गरजूंना कोरोनावरील लस घेणे सुलभ व्हावे यासाठी खोर्ली ग्रामपंचायतीच्या आवारात तात्पुरती शेड उभारण्यात आली आहे.
सध्या खोर्ली आरोग्य केंद्रात लसीकरण होत होते. तथापि, केंद्रावरील कोरोनासंबंधीत विविध चाचण्यांचा वाढलेला ताण कमी व्हावा यासाठी श्री. सिद्धेश नाईक यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने खोर्ली ग्रामपंचायतीच्या शेजारी पत्र्यांची तात्पूरती शेड उभारली आहे. या नव्या जागेत लवकरच 18 ते 40 वयोगटातील लोकांना लसीकरण करून घेता येईल. जिल्हा पंचायत सदस्यपदी निवड झाल्यापासून श्री. सिद्धेश नाईक यांनी समाज सेवेच्या कामांचा धडाका लावला असून खोर्ली मतदार संघातील लोकांना त्यांच्या समस्या सोडविणे सोपे व्हावे यासाठी अलीकडेच बायंगिणी येथे स्वतःचे कार्यालय सुरू केले आहे. खोर्ली मतदार संघातील लोकांसाठी त्यांनी मोफत कायदा सल्ला देण्याची महत्वपूर्ण सेवा उपलब्ध केली आहे.