वॉशिंग्टन/ वृत्तसंस्था :
प्रतिनिधिगृहाच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांनी सिनेटला अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधातील महाभियोगाचे दोन दस्तऐवज गुरुवारी सोपविले आहेत. या दस्तऐवजांवर स्वाक्षरी करण्यासाठी पेलोसी यांनी खासदारांना पेनचेही वाटप केले आहे. अध्यक्ष ट्रम्प यांनी स्वतःच्या पदाच्या गोपनीयतेचे उल्लंघन केले असून राष्ट्रीय सुरक्षेकडे डोळेझाक करत निवडणूक प्रक्रियेला धोक्यात आणल्याचा दावा पेलोसी यांनी यावेळी केला आहे.
दस्तऐवज सोपविण्यात आल्यावर महाभियोगाच्या सुनावणीसाठी निवडण्यात आलेल्या सभागृह व्यवस्थापकाने (हाउस मॅनेजर) सिनेटच्या चेम्बरमध्ये सर्व सदस्यांच्या उपस्थितीत ट्रम्प यांच्यावरील आरोपांचे वाचन केले आहे. पहिल्या दस्तऐवजात ट्रम्प यांच्यावर सत्तेच्या गैरवापराचा आरोप आहे. तर दुसऱया दस्तऐवजात महाभियोगाच्या सुनावणीदरम्यान संसदेच्या कामकाजात अडथळे आणल्याचा आरोप नमूद आहे.
सिनेटमध्ये जाणार सरन्यायाधीश
सिनेटचे नेते मिच मॅक्कॉनेल यांनी सर्व सदस्यांना पुढील कारवाईसंबंधी माहिती दिली आहे. अमेरिकेचे सरन्यायाधीश जॉन रॉबर्ट्स सर्व खासदारांच्या वतीने शपथ घेणार आहेत. अमेरिकेच्या इतिहासात सिनेटला न्यायालयात रुपांतरि करण्याची ही तिसरीच वेळ असणार आहे. महाभियोगाची सुनावणी मंगळवारपर्यंत सुरू होणार आहे. व्हाईट हाउसला सुनावणी प्रलंबित असल्याची माहिती दिली जाणार आह. आरोपांवर स्पष्टीकरण देण्यासाठी किंवा स्वतःचा वकील पाठविण्यासाठी सिनेट अध्यक्षांना समन्स बजावणार आहे.
ट्रम्प यांच्यावरील आरोप
पेलोसी यांनी सप्टेंबर 2019 मध्ये ट्रम्प यांच्यावर देशाचा विश्वासघात केल्याचा आरोप केला होता. 19 डिसेंबर रोजी ट्रम्प यांच्या विरोधात महाभियोगासाठी सभागृहात दोन प्रस्ताव मांडण्यात आले होते. प्रस्तावांवरील मतदानात डेमोक्रेट्सनी ट्रम्प यांच्या विरोधात तर रिपब्लिकन खासदारांनी ट्रम्प यांच्या समर्थनार्थ भूमिका घेतली होती. दोन्ही प्रस्तावांच्या बाजूने 230 तर विरोधात 197 मते पडली होती. ट्रम्प यांनी दोन डेमोक्रेट्स खासदार तसेच ज्यो बिडेन यांच्या विरोधात चौकशी सुरू करण्यासाठी युक्रेनवर दबाव टाकल्याचा आरोप आहे. वैयक्तिक तसेच राजकीय लाभासाठी स्वतःच्या शक्तींचा गैरवापर करत 2020 च्या अध्यक्षीय निवडणुसाठी युक्रेनकडून मदत मागितल्याचा आरोप ट्रम्प यांच्यावर आहे.