वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशात लॉकडाऊमुळे जीवनावाश्यक वस्तूंच्या पुरवठय़ाशिवाय अन्य घटकांना वाहतूक करण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे अनेक उत्पादक आता ऑनलाईन सेवा देण्यासाठी धडपड करत असल्याचे दिसून आले आहे. यात सिप्लाची सहयोगी कंपनी सिप्ला हेल्थकडून बुधवारी आरोग्याशी संबंधीत उत्पादनांचे थेट ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोचविण्यासाठी स्विगी, झोमॅटो आणि डुंजो यांच्यासोबत भागीदारी केली असल्याची घोषणा केली आहे.
सदरच्या भागीदारीमुळे कोरोनाच्या संकटातही आम्ही सेवा देण्यात कार्यरत राहणार असल्याचा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे. या निर्णयामुळे पुरवठा नेटवर्कच्या मदतीने सिप्ला हेल्थ देशातील जवळपास 45 शहरांमध्ये चार लाख लोकांपर्यंत आपली सेवा देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे स्पष्टीकरण कंपनीने दिले आहे.
संकटातही सेवा
आम्ही प्रमुख उत्पादनांचा पुरवठा करण्यासाठी भागीदारी केली आहे. यामुळेच ही तडजोड करुन ग्राहकांना कोरोनाच्या संकटातही सेवा देण्यासाठी कार्यपद्धती राबविण्यात येणार असल्याचे सिप्ला हेल्थचे सीईओ शिवम पुरी यांनी सांगितले आहे.