प्रतिनिधी/ वास्को
वेर्णा आद्यौगिक वसाहतीत स्थापन करण्यात आलेल्या सियारा सर्किटस् (इंडिया) प्रा. लि. या कंपनीच्या गोव्यातील युनिटचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते बुधवारी उद्घाटन करण्यात आले. यावेळी वाहतुक व पंचायतराजमंत्री माविन गुदिन्हो तसेच सियारा सिर्किटस् कंपनीचे संस्थापक अध्यक्ष केनेथ बहल, उपाध्यक्ष स्वारन बाला बहल, कंपनीचे कार्यकारी संचालक निलेश पराटे, संचालक नवीन राय व इतर मान्यवर उपस्थित होते. बुधवारी दुपारी वेर्णा औद्योगिक वसाहतीतील कंपनीच्या युनिटमध्येच हा उद्घाटन सोहळा पार पडला.
सियारा सर्किटस् प्रा. लि. ही कंपनी अमेरीका स्थित असून पीसीबी उत्पादन हे कंपनीचे वैशिष्ठ आहे. दोन वर्षांपूर्वी या कंपनीने वेर्णा औद्योगिक वसाहतीत प्रवेश केला होता. आता प्रत्यक्ष उत्पादनाला सुरवात होणार आहे. या उद्घाटन सोहळय़ाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत प्रमुख पाहुणे तर वाहतुकमंत्री माविन गुदिन्हो सन्मानिय पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी कंपनीचे संस्थापक व अध्यक्ष केनेथ बहल यांनी सियारा सर्किट विषयी व गोव्यातील प्रवेशाविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. उपाध्यक्ष स्वारन बाला बहल यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रारंभी कंपनीचे कार्यकारी संचालक निलेश पराटे तसेच संचालक नवीन राय यांनी पाहुण्यांना कंपनीविषयी व कंपनीच्या वाटचालीविषयी माहिती दिली.
स्थानिकांना अधिक रोजगार पुरवणाऱया उद्योगांना सरकारचे पाठबळ राहणार
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी कंपनीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, अधिकारी व कर्मचाऱयांना उद्देशून बोलताना गोव्यातील उद्योगाच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सरकारच्या विचाराधीन असलेल्या गोव्याच्या औद्योगीक धोरणाविषयीही ते बोलले. गोव्यात येणारे जे उद्योग गोव्यातील युवकांना अधिकाअधीक समावून घेतील त्या उद्योगांसाठी अधिक सुविधा उपलब्ध करण्यावर सरकार भर देणार आहे. येत्या अर्थसंकल्पात अशी तजवीज करण्यात येईल. खाजगी उद्योगातील रोजगार स्थानिक युवकांना उपलब्ध होण्याची गरज असून असे कुशल मनुष्यबळ गोव्यात उपलब्ध आहे. सियारा सर्किट कंपनीने उपलब्ध स्थानिक मनुष्यबळाचा वापर कंपनीसाठी करावा असे ते म्हणाले. सियारा सर्किट कंपनीचे स्वागत करण्याची चांगली संधी आपल्याल लाभली आहे. आता अधिका अधिक कंपन्या गोव्यात येतील. नव्या कंपन्यांसाठी सरकार चांगल्या सुविधा उपलब्ध करणार आहे. वेर्णा औद्योगिक वसाहत इतर वसाहतीत उद्योगांना वीज व्यवस्था तसेच जमनीचे व इतर प्रश्न सतावत असल्याची आपल्याला कल्पना आहे. सर्व समस्या सरकार सोडवणार आहे. जे उद्योग गोव्यात येण्यास उत्सुक आहेत त्यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांचे कार्यालय स्वत लक्ष घालणार असून त्यांच्या समस्या सोडण्यासाठी तत्पर राहणार आहे असे मुख्यमंत्री म्हणाले. उद्योग विकास मंडळही काळजी घेणार आहे. सरकार उद्योगांना चांगल्या सुविधा पुरवण्याचा प्रयत्न करीत असल्याने अस्तित्वात असलेल्या उद्योगानाही लाभ होणार आहे. सरकार निश्चितच गोव्यात हरीत उद्योग, आयटी उद्योग व अन्य तंत्रज्ञान उद्योग पाहण्यास उत्सुक आहे. सियारा सर्किट उद्योगाने गोव्यात युनिट स्थापन करून गोव्यातील औद्योगिक वसाहतीत क्रांती आणलेली आहे असे मुख्यमंत्री म्हणाले.
स्वच्छ आणि उच्च तंत्रज्ञानयुक्त उद्योगांमुळे गोव्यात रोजगार निर्मिती होईल
वाहतुकमंत्री माविन गुदिन्हो यांनी यावेळी बोलताना सियारा सर्किटस्मध्ये आपली विचार प्रक्रिया आपल्या कल्पना प्रत्यक्षात परीवर्तीत करून मनुष्याला, समाजाला, उद्योगांना, सुरक्षा संस्थांना तसेच माणसांना उपयुक्त असलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी आवश्यक असलेली उत्पादन निर्मिती तीही वेर्णा उद्योगीक वासहतीत केली जाणार आहे हे फार महत्वाचे असल्याचे सांगितले. उच्च कौशल्यातूनच अशा उत्पादनाची निर्मिती होत असते. आम्ही भारतीय कुठेही कमी नाही. अमेरीकेतील नासामागे भारतीय मेंदुच आहेत. आम्ही भारतीय चांगल्यात चांगल्या गोष्टी इतर देशांना देतो तर आपल्या भारतात का करू शकत नाही असा प्रश्न त्यांनी केला. वेर्णा औद्योगिक वसाहत आपल्या उद्योगमंत्रीपदाच्या काळातील असून आपलेच ते अपत्य आहे असे सांगून मुख्यमंत्र्यांनी गोव्यात स्वच्छ, हरीत, आयटी तसेच उच्च तंत्रज्ञानयुक्त उद्योगांना गोव्यात सहकार्य करण्यावर दिलेला भर गोव्यात रोजगार निर्मिती करण्यासाठी मोलाची भुमिका बजावेल असे मंत्री गुदिन्हो म्हणाले.