सावंतवाडी /वार्ताहर –
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबई येथील सिल्व्हर ओक निवास्थानी झालेला हल्ला निंदनीय असून त्याचा मी तीव्र निषेध करत आहे असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, महाराष्ट्राच्या राजकारणाची पातळी किती हिन दर्जाची होत चालली आहे याचं हे उदाहरण आहे. सत्तेसाठी वखवखलेले पुढारी या कटामध्ये सहभागी आहेत याची उच्चस्तरीय चौकशी महाराष्ट्राच्या गृहमंत्रालयाने करावी अशीही मागणी करत आहे. काल झालेल्या मुंबई येथील एसटी कर्मचाऱ्यांचा समोर बोलताना वकील गुणरत्न सदावर्ते यांनी चिथावणीखोर भाषण देऊन सदरचा प्रकार घडवून आणला आहे.. या गुणरत्न सदावर्ते वरती गुन्हा दाखल करा अशी मागणी साळगावकर यांनी केले आहे. पवार साहेबांच्या सिल्वर ओक निवास्थानी हल्ला करणारे खरेच एसटी कर्मचारी होते की भाडोत्री गुंड होते याची चौकशी व्हायला हवी.