शस्त्रक्रिया करायची त्याची टेस्ट पॉझिटिव्ह – वैद्यकीय पथकाला क्वारंटाईन होण्याची वेळ
प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहरात सध्या मोठय़ा प्रमाणावर कोरोना बाधित येत असल्याने वातावरण पॅनिक झालेले असताना आता थेट जिल्हा रुग्णालयातील ऑपरेशन थिएटरच्या टेबलवर शस्त्रक्रियेसाठी एका रुग्णाला घेतले असताना त्याचा अहवाल बाधित आल्याने त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी आलेल्या वैद्यकीय पथकाला क्वारंटाईन होण्याची वेळ आलीय. कोरोनाचा शिरकाव ऑपरेशन थिएटरमध्ये झाल्याने आता थिएटर सॅनिटाईराईज केल्याशिवाय पुढील शस्त्रक्रिया होणार नाहीत.
याबाबत मिळालेली माहिती अशी, जिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या एका रुग्णावर शस्त्रक्रिया करण्यासाठी त्याला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेले असता त्याच्या चाचण्या केल्या असता तो पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली. जिल्हा रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांशिवाय अन्य आजार असलेल्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
दोनच दिवसापूर्वी जिल्हा रुग्णालयात यापूर्वी दाखल असलेल्या एका रुग्णावर शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. रुग्णालयातील दुसऱया मजल्यावर सुसज्ज ऑपरेशन थिएटरमध्ये त्या रुग्णाला शस्त्रक्रिया करण्यासाठी वैद्यकीय पथक घेऊन गेले. शस्त्रक्रिया करण्यापूर्वी आवश्यक त्या सर्व तपासण्या करण्याचा सोपस्कार पार पाडण्यात आला. याचवेळी त्याची कोरोना चाचणी करण्यात आली असता तो पॉझिटिव्ह असून त्याच्यामध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आल्यामुळे वैद्यकीय पथकामध्ये एकच खळबळ उडाली.
मुळात अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया करताना कधीही पीपीइ किट वापरण्यात आले नाही. यावेळीही ते वापरण्यात न आल्यामुळे वैद्यकीय पथकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आता त्या संबंधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्वच नर्सेस, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी यांच्यावर स्वतःची चाचणी करून घेण्याची वेळ आली आहे. कोरोनाने ऑपरेशन थिएटरपर्यंत शिरकाव करण्याची ही पहिलीच वेळ ठरली. ऑपरेशन थिएटरमध्ये कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यामुळे संपूर्ण थिएटर सॅनिटायझर केल्यानंतरच यापुढच्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.