कोरोनामध्ये थिजली माणुसकी : निगेटिव्ह रिपोर्ट असताना देखील मृतदेह नाही स्वीकारला
प्रतिनिधी/ सातारा
कोरोनामध्ये माणुसकी असल्याच्या घटनाही अनुभवल्या तर माणुसकी नसण्याच्या घटनांनी देखील माणसांच्या काळजाला घरे पडली. सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात देखील माणुसकी हरपल्याची घटना समोर आलीय. एका रुग्णाचे दुर्देवाने उपचार सुरु असताना मृत्यू झाला. मृत्यू पश्चात त्याची कोरोना टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह आला. मग नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह देण्यास हरकत नसल्याने कर्मचारी नातेवाईकांना शोधू लागले तर रुग्ण मृत झाल्याचे समजताच नातेवाईकच रुग्णालयातून गायब झाले होते.
कोरोनामुळे अनेकांचे व्यवसाय लयाला गेले. अनेकांच्या नोकऱया गेल्याने आर्थिक अडचणीमुळे अनेकांचे संसार मेटाकुटीस आलेत. मात्र त्यात देखील जगण्याची लढाई सुरुच आहे. या कोरोना काळात माणुसकी जपण्याची गरज असताना मृतदेह रुग्णालयात नातेवाईक गायब झाल्याने ही माणुसकीही हरपल्याची घटना समोर आली अन पोलीस अन आरोग्य कर्मचारीही अवाक झाले.
याबाबत मिळालेली माहिती अशी, सातारा जिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन वार्ड क्रमांक 3 उपचार सुरू असणाऱया एका व्यक्तीचा मंगळवारी सकाळी मृत्यू झाला. वैद्यकीय अधिकाऱयांनी मृत्यू पश्चात त्याची कोरोना चाचणी केली असता त्याचा अहवाल निगेटिव्ह आला. ही बाब माहिती असतानाही संबंधित व्यक्तीचे नातेवाईक तेथून आश्चर्यकारकपणे गायब झाले. ही बाब तेथे काम करणाऱया काही कर्मचाऱयांचा निदर्शनास आल्यानंतर त्यांनी जिल्हा रुग्णालयाच्या आवारात शोधाशोध केली मात्र नातेवाईक मिळून आले नाहीत.
त्यामुळे त्या मृतदेहाचे करायचे काय? असा प्रश्न कर्मचाऱयांच्या पुढे पडला. नातेवाईक जोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेतो अथवा घेणार नाही, असे लिहून देत नाही, तोपर्यंत जिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनाला कोणताही निर्णय घेता येईना. कर्मचाऱयांनी ही बाब जिल्हा रुग्णालयातील पोलीस चौकीत कार्यरत असणाऱया पोलीस हवालदार बनकर यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर यांनी नातेवाइकांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.