सब-इन्स्पेक्टर दर्जाच्या अधिकाऱयाचा मृत्यू
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे सीआरपीएफ तुकडीतील एका वरिष्ठ अधिकाऱयाचा मंगळवारी रात्री मृत्यू झाला. या मृत्यूमुळे केंद्रीय राखीव पोलीस दलातील पहिल्या मृत्यूची नोंद झाली आहे. सब-इन्स्पेक्टर दर्जाच्या अधिकाऱयाचा मृत्यू झाल्यानंतर दिल्लीतील संबंधित संपूर्ण बटालियन सील करण्यात आली असून तब्बल 1,100 जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस देशात अधिकच वेगाने पसरू लागला आहे. सर्वसामान्य नागरिकांसह सुरक्षा आणि आरोग्य विभागातील महनीयही या विषाणूच्या विळख्यात सापडत आहेत. वेगाने होणाऱया प्रसारामुळे आता सुरक्षा दलेही अधिक सतर्क झाली आहेत. सीआरपीएफच्या 31 बटालियनमध्ये तैनात सब इन्स्पेक्टरचा या आजाराने मृत्यू झाला आहे. सीआरपीएफमध्येही कोरोना विषाणूच्या संक्रमित रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. आतापर्यंत 46 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले असून अजूनही 257 जणांच्या चाचणीचे अहवाल येणे बाकी आहेत.
गृह मंत्रालयाने मागविला अहवाल
सीआरपीएफमधील कोरोना संसर्गाची दखल केंद्र सरकारने गंभीरपणे घेतली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने याबाबत नाराजी व्यक्त केली असून सीआरपीएफ महासंचालकांकडून लेखी अहवाल मागविण्यात आला आहे. कोरोनाचा फैलाव वेगाने होण्यामध्ये झालेल्या चुकांबाबत स्पष्ट मते सदर अहवालामध्ये नोंदवावीत, असे स्पष्ट निर्देश गृह मंत्रालयाकडून देण्यात आले आहे. सदर अहवाल 30 एप्रिलपूर्वी सादर करण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. तसेच सध्या सुटीवर असलेल्या जवानांना सीआरपीएफ इस्पितळांमध्ये जाऊन वैद्यकीय चाचण्या करण्यासही सांगितले आहे.