वृत्तसंस्था/ बॅसेटेअर
सेंट किट्स अँड नेव्हिस पॅट्रिअट्स संघाने गयाना अमेझॉन वॉरियर्सवर 7 गडय़ांनी विजय मिळवित कॅरिबियन प्रिमियर लीगच्या अंतिम फेरीत धडक मारली.
अमेझॉन वॉरियर्सने प्रथम फलंदाजी मिळाल्यावर सुरुवात चांगली केली. पण मध्यफळी गडगडली. मात्र अखेरच्या टप्प्यात शिमरॉन हेतमेयरने (20 चेंडूत 45) केलेल्या फटकेबाजीमुळे त्यांना निर्धारित 20 षटकांत 9 बाद 178 धावांपर्यंत मजल मारता आली. हेतमेयरने शेवटच्या षटकात 25 धावा तडकावल्या. त्यानंतर गेल व एविन लुईस यांनी पॅट्रिअट्सला सहा षटकांत 68 धावांची सलामी दिली. गेलने 27 चेंडूत 42 धावा फटकावल्या. लुईसने कर्णधार ब्रॅव्होच्या साथीने संघाला 13 चेंडू बाकी ठेवत 7 गडय़ांनी विजय मिळवून दिला. लुईसने 39 चेंडूत नाबाद 77 धावा झोडपल्या. पॅट्रिअट्सची जेतेपदाची लढत सेंट लुसिया किंग्सशी होणार आहे. दोन्ही संघांनी प्रथमच अंतिम फेरी गाठली असल्याने या स्पर्धेला नवा विजेता मिळणार आहे.