प्रतिनिधी/ नवी दिल्ली, कोल्हापूर
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात असलेल्या दाव्यावरील सुनावणी लांबणीवर पडली आहे. बुधवार दि. 30 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार होती. पण एक न्यायमूर्ती उपस्थित राहू न शकल्याने सुनावणी होऊ शकलेली नाही. दरम्यान, आज गुरुवारीही सुनावणी होणार नसल्याचे स्पष्ट झाले असून शुक्रवारी सुनावणी होणार की नाही? याबाबतही संदिग्धता वर्तविली जात आहे. आज गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाकडून शुक्रवारी स्पष्टता होण्याची शक्यता आहे.
सध्या सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठापुढे तामिळनाडूतील बहुचर्चित जलीकट्टू खेळाच्या संदर्भातील याचिकेवर सुनावणी सुरू आहे. सोमवारपासून सलगपणे सुनावणी सुरू करण्यात आली आहे. या दाव्यातील सुनावणीत असणारे एक न्यायाधीश सीमाप्रश्नाच्या दाव्यातील खंडपीठामध्येही सदस्य न्यायाधीश आहेत. जलीकट्टूच्या सुनावणीमुळे ते सीमाप्रश्नाच्या सुनावणीत सहभागी होऊ शकलेले नाहीत. बुधवारी ते अनुपस्थित राहिल्याने सुनावणी होऊ शकली नाही. गुरुवारीही जलीकट्टूच्या याचिकेवरील सुनावणी चालणार आहे. त्यामुळे सीमाप्रश्नाच्या दाव्याची सुनावणी गुरुवारी होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.