प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन केंद्र सरकारने 22 मार्चपासून देशात लॉकडाऊन केले होते. याचा फटका सुकन्या समृद्धी योजनेला बसला होता. लॉकडाऊनच्या काळात या योजनेची मुदत संपल्यानंतरही मुदतवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे 10 वर्षे पूर्ण झालेल्या मुलींना खाते उघडण्यासाठी 31 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे याचा फायदा या योजनेचा लाभ घेणाऱया मुलींना मिळणार आहे.
मुलींचे उच्चशिक्षण व लग्नाची तरतूद व्हावी, याकरिता दहा वर्षांच्या आतील मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेमध्ये अनेक पालकांनी आपल्या मुलींच्या नावे खाती काढून त्यावर बचत सुरू केली आहे. परंतु लॉकडाऊनच्या काळात ज्या मुलींना 10 वर्षे पूर्ण झाली त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नव्हता. त्यासाठी केंद सरकारने नियमावलीत बदल केला असून 25 मार्च ते 30 जून या काळात 10 वर्षे पूर्ण झालेल्या मुलींना 31 जुलैपर्यंत खाते उघडण्याची मुभा दिली आहे.
बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेंतर्गत सुकन्या समृद्धी योजना सुरू करण्यात आली. मुलीच्या वयाच्या 18 व्या वर्षांपर्यंत खात्यामध्ये रक्कम जमा करावयाची आहे. वयाच्या 18 व्या वर्षांनंतर खात्यातील 50 टक्के रक्कम शिक्षणासाठी तर बाकी रक्कम 21 व्या वर्षांनंतर लग्नासाठी वापरता येते. 18 ते 21 दरम्यान केव्हाही लग्नासाठी ही रक्कम काढता येऊ शकते. जमा झालेल्या रकमेवर निश्चित दराने व्याज दिले जाते.
येथे सुरू करा खाते
सुकन्या समृद्धी योजनेचे खाते पोस्ट कार्यालय, सरकारी व खासगी बँकांमध्ये उघडता येते. प्रत्येक महिन्याला 250 ते 1.5 लाख रुपये रक्कम जमा केली जाऊ शकते. ही योजना 10 वर्षांच्या मुली व एका कुटुंबात दोन मुलींसाठीच आहे. बेळगाव पोस्ट कार्यालयात सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत अनेक खाती उघडण्यात आली आहेत.
नागरिकांनी संधीचा लाभ घ्यावा
-एस. डी. कुलकर्णी (पोस्ट अधीक्षक, बेळगाव विभाग)
लॉकडाऊनमुळे मार्च, एप्रिल व जून महिन्यात अनेकांना सुकन्या समृद्धी योजनेचे खाते काढता आलेले नाही. यासाठी केंद्र सरकारने 31 जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. मुलींच्या भविष्याचा विचार करता ही योजना अत्यंत लाभदायी आहे. नागरिकांनी या मिळालेल्या संधीचा लाभ घ्यावा, असे त्यांनी सांगितले.