पणजी / प्रतिनिधी
माजी उपमुख्यमंत्री आणि मगो नेते सुदिन ढवळीकर तसेच त्यांच्या पत्नीही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे कोरोनाची लागण मडकईमध्ये आमदारापर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट झाले. या घटनेने त्या परिसरात एकच खळबळ माजली. यांनी स्वतः सायंकाळी उशिरा ट्विटरवरुन आपण पॉझिटिव्ह असल्याचे जाहीर केले. त्याचबरोबर आपल्या संपर्कात गेल्या पाच दिवसांमध्ये जी कोणी मंडळी आली असतील तर त्यांनी आपली स्वतःची तपासणी करून घ्यावी, अशी विनंती देखील त्यांनी केली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मंगळवारी दुपारी त्यांनी ढवळी येथे आपल्या निवासस्थानी एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी पुण्यातील अनेक पत्रकार उपस्थित होते. सायंकाळी सुदिन ढवळीकर पॉझिटिव्ह असल्याचे जाहीर होताच या पत्रकारांना देखील एकच धडकी बसली. सुदिन ढवळीकर इस्पितळात दाखल झाल्याचे त्यांनी सायंकाळी जाहीर केले.