मुंबई – प्रतिनिधी
क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणात आर्यन खानच्या जामीन प्रकरणावर मंगळवारी सुनावणी संपली आहे. तथापि न्यायालयाचे कामकाज संपल्याने याची सुनावणी आता उद्या बुधवारवर ढकलण्यात आली आहे. त्यामुळे आर्यन खानची आजची रात्रही तुरुंगातच जाणार आहे. दरम्यान या प्रकरणातील मनिष राजेगरिया यांनी जामीन मंजूर झाला आहे.
आर्यन खानच्यावतीने युक्तीवाद करताना त्याचे वकिल आणि माजी ऍटर्नी जनरल मुकुल रोहतगी म्हणाले, आर्यनकडे कोणतेही ड्रग्ज सापडले नाहीत, त्याने ड्रग्ज घेतल्याचे कोणतेही पुरावे सापडले नाहीत. एनसीबीने अधिकारांचा दुरुपयोग करत आर्यनला पकडले.त्याची वैद्यकीय चाचणीदेखील केली नाही. अरबाजच्या बुटात काही प्रमाणात ड्रग्ज सापडले असल्याचा युक्तीवाद केला.
तथापि आर्यनच्या जामिनाला एनसीबीने विरोध केला. तपासाच्या या टप्प्यावर जामीन दिल्यास खटल्यावर थेट परिणाम होईल, असा दावा एनसीबीने केला. या प्रकरणातील पंच प्रभाकर साईल फुटला आहे, त्यामुळे साईल यांच्या प्रतिज्ञापत्राची न्यायालयाने दखल घेऊ नये अशी विनंतीही एनसीबीचे वकिल अनिल सिंह यांनी उच्च न्यायालयात केली.
दरम्यान, आर्यनच्या सुनावणीच्या वेळी कोर्टरुममध्ये प्रचंड गर्दी झाली होती. कोर्टातील गर्दी वाढल्यानं न्यायाधीशांनी कामकाज काही वेळ थांबवलं होतं.
गेल्या आठवडय़ात बुधवारी विशेष एनडीपीएस कोर्टानं आर्यनचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर आर्यनच्या वकिलांनी तात्काळ मुंबई उच्च न्यायालयात विशेष एनडीपीएस कोर्टाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दाखल केली होती. आर्यनसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांच्या जामिनावर सुनावणी झाली आहे.
आर्यनचे वकिल म्हणाले…..
आर्यन खानकडे कोणतेही ड्रग्ज सापडले नाहीत, त्याने ड्रग्ज घेतलेले कोणतेही पुरावे सापडले नाहीत. एनसीबीने अधिकारांचा दुरुपयोग करत आर्यनला पकडले.त्याची वैद्यकीय चाचणीदेखील केली नाही. अरबाजच्या बुटात काही प्रमाणात ड्रग्ज सापडले असा युक्तीवाद आर्यन खानचे वकील माजी ऍटॉर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी केला.
एनसीबीचा दावा….. आरोपीकडे अमली पदार्थ सापडोत अथवा न सापडोत, एनडीपीएस कायद्यातील कलम 29 नुसार अश्या कटात सामील असणं हा एक गंभीर गुन्हा आहे. तुमच्याकडे ड्रग्ज नाही जरी सापडले तरी जेव्हा एनडीपीएस कायद्यातील कलम 29 लावलं जातं तेव्हा आरोपी मुख्य सुत्रधाराइतकाच दोषी असतो असं एनसीबीतर्फे एएसजी अनिल सिंह यांनी कोर्टाला सांगितलं.