काँग्रेस खासदार कार्ति चिदंबरम यांचा दावा
अभिनयाच्या क्षेत्रातून राजकारणात पाऊल ठेवणारे कमल हासन हे ‘सुपर-नोटा’ असल्याचा दावा काँग्रेस खासदार कार्ति चिदंबरम यांनी केला आहे. हासन यांचा मक्कल निधि मय्यम तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीत एकही जागा जिंकू शकणार नसल्याचे ते म्हणाले.
राज्यातील शिवगंगाचे खासदार कार्ति यांनी अण्णाद्रमुक-भाजप आघाडीवरही निशाणा साधला आहे. भाजपच्या छायेतील कुठल्याही प्रकारचे सरकार तामिळनाडूची जनता इच्छित नाही. भाजपच्या ‘हिंदी-हिंदुत्व’च्या अजेंडय़ाबद्दल जनतेत संताप असल्याचा दावा कार्ति यांनी केला आहे.
द्रमुक-काँग्रेस आघाडी या निवडणुकीत 234 पैकी 200 हून अधिक जागांवर विजयी होणार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. तामिळनाडूतील सर्व जागांवर 6 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.
तमिळ भावना, तमिळ भाषा आणि तमिळ इतिहासाचा सन्मान न करणारे सरकार लोक इच्छित नाहीत. कुठल्याही प्रकारे भाजपचे नियंत्रण असलेले सरकारही जनतेला नकोसे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या अन्य वरिष्ठ नेत्यांच्या आक्रमक प्रचारानंतरही भाजपचे तामिळनाडूत खाते उघडणार नसल्याचा दावा चिदंबरम यांनी केला आहे.
कमल हासन हे केवळ ‘सुपर-नोटा’ आहेत. त्यांचा पक्ष एकही जागा जिंकणार नाही. तसेच त्यांचा पक्ष फारकाळ टिकणार देखील नाही. निवडणुकीवेळी ते एकत्र येतात आणि निवडणूक झाल्यावर गायब होतात असे कार्ति म्हणाले. ‘नोटा’ ईव्हीएमवर ‘नन ऑफ द अबोव्ह’ (यापैकी कुणीच नाही)चा एक पर्याय असतो. एखाद्या मतदाराला संबंधित उमेदवारांपैकी कुणालाच मत द्यायचे नसल्यास तो नोटाचा पर्याय स्वीकारू शकतो. ही व्यवस्था 2013 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या एका आदेशानंतर लागू झाली होती.