प्रतिनिधी/ निपाणी
दोन महिन्यांपासून गोरंबे (ता. कागल) येथून बेपत्ता असलेल्या महिलेचा मृतदेह निपाणी बसस्थानकानजीक चिकोडी रोडवरील शाह यांच्या शेतात आढळून आला. गीता सागर शिरगावकर (वय 34, रा. गोरंबे, ता. कागल) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी कागल पोलिसांनी पती व निपाणीतील तिघे अशा चौघा संशयितांना ताब्यात घेऊन कसून चौकशी चालविली आहे. सागर दिनकर शिरगावकर (रा. गोरंबे ता. कागल), गणेश राजेंद्र जासूद, आकाश अनिल पसारे (दोघेही रा. जासूद गल्ली, निपाणी) व प्रशांत प्रकाश परीट (रा. पेंडस् कॉर्नर निपाणी) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. दरम्यान पतीनेच सुपारी देऊन पत्नीचा खून केल्याचा संशय असून त्या दृष्टीने पोलीस तपास करत आहेत. शनिवारी सदर घटनेचा उलगडा होणार आहे.
याबाबत सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, गोरंबे (ता. कागल) येथील सागर व गीता यांचे पूर्वीपासून प्रेम संबंध होते. 18 वर्षांपूर्वी गीता हिचा विवाह कोगे (ता. करवीर जि. कोल्हापूर) येथील युवकाशी झाला होता. तिला मुलगा व मुलगी अशी दोन अपत्ये आहेत. असे असतानाही सागर व गीता यांचे प्रेमसंबंध सुरुच होते. यातूनच गीता हिने तिचा पती व दोन मुले यांना सोडून 6 महिन्यापूर्वी सागर याच्याशी नृसिंहवाडी येथे विवाह केला. सागर याचेही यापूर्वी लग्न झाले आहे. यानंतर सागर हा दोन पत्नींसह घरी राहत होता. मात्र यावेळी सागर व गीता यांच्यात किरकोळ कारणावरुन वारंवार वाद होत होते.
यातूनच सुपारी देत गीता हिचा खून करण्यात आल्याची शक्यता वर्तविली जात आहे. तर दुसरीकडे सागर याने 28 जुलै रोजी आपली पत्नी बेपत्ता झाल्याची फिर्याद कागल पोलीस स्थानकात दिली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला होता.
दरम्यान शुक्रवारी पहाटे कागल पोलिसांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर खुनाचा प्रकार उघडकीस आला. दोन महिन्यापूर्वी खून झाल्याने मृतदेह पूर्णपणे सडलेल्या स्थितीत होता. यानंतर कागल पोलिसांनी पती सागरसह चौघा संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी चालविली आहे. दरम्यान संशयितांनी खुनाची कबुली दिल्याचेही समजते. मात्र अद्याप पोलीस प्रशासनाकडून त्याला दुजोरा मिळालेला नाही.
मोबाईल उघडताच बिंग फुटले
गीता हिचा खून केल्यानंतर संशयितांनी तिचा मोबाईल आपल्याकडे घेत बंद ठेवला होता. हा मोबाईल त्यांनी खुनाच्या दीड महिन्यानंतर निपाणीतील एका व्यक्तीला विकला. त्या व्यक्तीने मोबाईल सुरू करताच त्याचे लोकेशन ट्रक झाले. त्याचा आधार घेत कागल पोलिसांनी निपाणीत येऊन सदर व्यक्तीची चौकशी केली. यानंतर सदर खुनाचा प्रकार उघडकीस आला. दरम्यान खुनापूर्वी गीता हिच्यावर बलात्कार झाला का? या दृष्टीनेही पोलीस तपास करीत आहेत.
अन् दोघे नातेवाईक कोरोना पॉझिटिव्ह
दरम्यान कागल पोलिसांनी शुक्रवारी पहाटेपासून निपाणीत खुनाचा तपास सुरू ठेवला होता. दुपारी गोरंबे येथील गीताचे काही नातेवाईक घटनास्थळी आले होते. खुनाची चर्चा सुरू असतानाच येथील दोघे नातेवाईक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्यांची पाचावर धारण बसली.