कैद रशियन सैनिकांच्या सुटकेच्या बदल्यात सोडले नियंत्रण
युद्धादरम्यान युक्रेनकडून मोठा दावा करण्यात आला आहे. सुमी क्षेत्रातून आता रशियन सैनिक परतत असल्याचे म्हटले गेले आहे. दोन्ही देशांच्या सैन्यांदरम्यान दीर्घ चर्चेनंतर हे घडले आहे. परंतु याचा अर्थ पूर्ण युक्रेनमधून रशियाचे सैनिक परतणार असा होत नाही. ही तडजोड केवळ एका युनिटपुरती मर्यादित आहे.
यासंबंधीची माहिती सुमी क्षेत्रीय सैन्य प्रशासनाचे प्रमुख दिमित्रो झायव्तस्की यांनी दिली आहे. शूत्र देशाचे (रशिया) सैनिक स्वतःची शस्त्रास्त्रs, सामग्रीसह परतत आहेत. दोन्ही बाजूंदरम्यान प्रदीर्घ चर्चा झाल्यावर दोघांनीही युद्धकैद्यांची मुक्तता केल्यावर रशियाचे सैन्य माघारी परतल्याचे दिमित्रो म्हणाले.
रशियाचे सैन्य 1 मार्च रोजी सुमी क्षेत्रातून मागे परतले आहे. तडजोड करारानुसार रशियाच्या सैनिकांना शस्त्रास्त्रs, रणगाडे आणि अन्य उपकरणे रशियात परत नेण्याची अनुमती देण्यात आली होती.
रशियन युनिटच्या प्रमुखाने आता आपण हे युद्ध लढणार नसल्याचे सांगत आपणाला रशियात आता तुरुंगात डांबले जाईल, परंतु मी आता रणगाडय़ांचे तोंड घराच्या दिशेने वळविण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले होते. रशियन सैन्याशी करार केल्यावरही स्थितीवर नजर ठेवली जात आहे, सुमी क्षेत्रात अद्याप रशियन सैन्याची अनेक उपकरणे असून ते आता युक्रेनमध्ये पश्चिमेच्या दिशेने पुढे सरकत असल्याचे दिमित्रो यांनी सांगितले. युक्रेन या युद्धात रशियासारख्या बलाढय़ देशाला निकराने प्रतिकार करत आहे.