वृत्तसंस्था/ सुरत
गुजरातमधील सुरत शहरामध्ये बंदोबस्तावर असणाऱया पोलिसांवर जमावाने हल्ला केला आहे. यामध्ये दोन पोलीस जखमी झाले असून दगडफेक करणाऱयांपैकी पाचजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अशा हल्लेखोरांना सातवर्षे कडक शिक्षेची तरतूद करण्यात आली असूनही होणारे हल्ले धोकादायक असल्याची चिंता पोलीस अधीक्षकांनी व्यक्त केली.
बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांना या समाजकंटकांनी दगडफेक केली. यामध्ये दोन पोलीस जखमी झाली आहेत. सुरतचे पोलीस उपायुक्त आर. पी. बरोत यांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी पाचजणांना ताब्यात घेतले आहे. डिंडोली परिसरामध्ये हा प्रकार घडला. लॉकडॉऊनमध्ये संचारबंदी अधिक कडक करण्याचा पोलीस प्रयत्न करत असताना हा प्रकार घडला. वारंवार आवाहन करुनही लोक विनाकारण फिरत होते आणि नियमांचे उल्लंघन करत होते. याकरता तेथे पीसीआर व्हॅन पाठवण्यात आली. पोलिसांना लोकांना घरी जाण्याचे आवाहन केल्यानंतर लोकांनी दगडफेक सुरु केली. मात्र त्यानंतर पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवल्याचेही बरोत यांनी सांगितले.