दैनिक तरुण भारत संवाद इम्पॅक्ट
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / बार्शी
बार्शी येथील बार्शी एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या अंतर्गत चालणारी सुलाखे हायस्कूल आणि सुलाखे उच्च माध्यमिक विद्यालय या शाळेतील एक शिक्षक तब्बल अकरा वर्ष पगार न मिळाल्यामुळे आमरण उपोषणास आपल्या कुटुंबासहित बसला होता . या प्रकरणात कांबळे या शिक्षकांचा पगार होईपर्यंत बाकी सर्व शिक्षकांचे पगार बंद करण्याचे आदेश सोलापूर शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी दिले होते. मात्र बऱ्याच नाट्यमय घडामोडीनंतर प्रकाश कांबळे या शिक्षकांचे वेतन देयक सुलाखे हायस्कूल च्या मुख्याध्यापकांनी सादर केल्याने आता या सर्व शिक्षकांचा पगार मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे.
सविस्तर वृत्त असे की 4 जून पासून सुलाखे हायस्कूल मधील प्रकाश कांबळे नावाचे शिक्षक अकरा वर्षे पगार न मिळाल्यामुळे आपल्या कुटुंबासह घरी आमरण उपोषणास बसले होते मात्र या विषयांमध्ये हायस्कूल संस्था किंवा शिक्षण विभाग कोणतेही लक्ष घालत नव्हते. तर उपोषणाच्या चौथ्या दिवसापासून दैनिक तरुण भारत संवाद ने ही बातमी लावून धरली आणि पाठपुरावा केल्याने बार्शीतील अनेक सामाजिक संघटना व राजकीय नेते यांचा कांबळे यांना पाठिंबा मिळाला होता तसेच याप्रकरणी बार्शीचे माजी आमदार दिलीप सोपल , उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओम दादा निंबाळकर यांनी ही शिक्षण क्षेत्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत ही बातमी लावून धरल्याने सोलापूर शिक्षणाधिकारी माध्यमिक सुद्धा साळुंखे यांनी सुलाखे हायस्कूल चे मुख्याध्यापक पाटकर यांना वेतन देयक सादर करण्याचे आदेश दिले होते .
मात्र सुलाखे हायस्कूल च्या वतीने हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून त्यांचे वेतन देयक सादर करता येणार नाही. अशा आशयाचे पत्र पाठवले होते. मात्र या विषयांमध्ये सुलाखे हायस्कूलचे मुख्याध्यापक पाटकर यांनी संदिग्ध आणि संशय घेणारी भूमिका घेतल्याने सोलापूर शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी जोपर्यंत कांबळे या शिक्षकांचे वेतन देयक सादर होत नाही तोपर्यंत शाळेत या शाळेतील इतर सर्व शिक्षकांचे पगार बंद करण्याचे आदेश दिले होते. मात्र आता तो शिक्षक प्रकाश कांबळे आणि त्याचे कुटुंब उपोषणाच्या नवव्या दिवशी सुलाखे हायस्कूल सादर केल्याने सर्व शिक्षकांचा पगार बंदीचा आदेश समाप्त झाला असे दैनिक तरुण भारत संवाद शी बोलताना सोलापूर शिक्षण उपनिरीक्षक मिलिंद मोरे यांनी सांगितले.