100 हून जास्त जखमी, संघर्ष चिघळण्याची शक्यता
तेहरान / वृत्तसंस्था
अमेरिकेच्या हल्ल्यात मारला गेलेला इराणचा लष्कर प्रमुख कासीम सुलेमानी याच्या अंत्ययात्रेत चेंगराचेंगरी झाल्याने किमान 35 जण मृत्युमुखी पडले असून 100 हून अधिक जखमी झाल्याचे सांगण्यात आले आहे. ही घटना सोमवारी रात्री उशीरा घडली. अंत्ययात्रेला 10 लाखांचा जमाव उपस्थित असल्याचे समजते.
सुलेमानी याच्या मृतदेहावर किरमान त्याच्या किरमान या नगरात सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी लक्षावधी लोकांची गर्दी होती. अंत्यसंस्कार झाल्यानंतर लोक परतत असताना ही चेंगराचेंगरी झाल्याचे वृत्त इराणच्या सरकारी प्रसारमाध्यमाने दिले आहे. मृतांची संख्या सांगितली जाते त्यापेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. काही जखमींना उपचारांसाठी तेहरान येथे आणण्यात आले आहे.
युद्धाचे ढग
सुलेमानीच्या मृत्युमुळे इराणमध्ये अमेरिका विरोधात संतापाची लाट उसळली आहे. सूडाची भाषा केली जात आहे. इराणच्या प्रशासनाने अमेरिकेच्या आस्थापनांवर हल्ले करण्याचा इशारा दिला आहे. तर ट्रंप प्रशासनाने सुलेमानी मारला जाण्याचे समर्थन केले असून ही दहशतवादविरोधी कारवाई होती असा दावा केला आहे. मध्यपूर्वेतील आखातावर सध्या युद्धाचे ढग आहेत.
भारताचे आवाहन
आखातात युद्ध सुरू झाल्यास कच्च्या इंधन तेलाचे दर भडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतासारख्या अर्थव्यवस्थांना फटका बसू शकतो. त्यामुळे सर्व संबंधितांनी परिस्थिती संयमाने हाताळावी. तसेच संघर्ष हाताबाहेर जाऊ देऊ नये, असे आवाहन भारताने अमेरिका व इराणला केले आहे.