सुव्ह प्रकारातील कार्सची विक्री अधिक ः पुढील वर्षी कार्स बाजारात
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जपानमधील ऑटो क्षेत्रातील कंपनी होंडाचा भारतातील व्यवसाय लवकरच गती घेताना दिसणार आहे. यासाठी पुढील वषी अधिक मागणीत असणाऱया सुव्ह (स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल) गटातील मोटारी बाजारात उतरवण्याचा इरादा कंपनीचा आहे.
सध्याला होंडाची एकही सुव्ह गटातील कार भारतीय बाजारात नाही. इतर कंपन्यांच्या सुव्ह गटातील कार्सना ग्राहकांचा तगडा प्रतिसाद मिळतो आहे. एकंदर पाहता दर वर्षाला जवळपास या गटातील 30 लाख वाहनांची विक्री होताना दिसते. यावरुन ग्राहकांचा कल समजू शकतो. हीच बाब हेरून कंपनीने आता आपला फोकस सुव्ह गटावर केंद्रित करण्याचे निश्चित केले आहे.
यापूर्वी कंपनीने सीआर-व्ही, बीआर-व्ही व मोबिलो या गाडय़ांची विक्री व उत्पादन थांबवले होते. सध्या कंपनीची मदार सेडान प्रकारातील मोटारींवर आहे. यातील सिटी, सिटी इएचइव्ही (हायब्रिड) व अमेझ या गाडय़ांच्या विक्रीवर कंपनीचा भर दिसतो. सध्या सुव्ह गटाचा वरचष्मा बाजारात दिसत असून या प्रकारातील मोटारी उतरविण्याचा इरादा कंपनीने व्यक्त केला आहे.
व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न ः त्सुमुरा
गेली 3 वर्षे कंपनीला खडतर गेली आहेत. आता मागे वळून न पाहता आगामी काळात व्यवसाय वृद्धीवर लक्ष केंद्रित करणार असून भारतीय बाजारात जास्तीत जास्त अस्तित्व राखण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, असे होंडा कार्स इंडियाचे अध्यक्ष टाकुया त्सुमुरा यांनी सांगितले.