निफ्टीचा प्रवास 14,500 अंकांच्या वर – एसबीआयचे समभाग मजबूत
वृत्तसंस्था/ मुंबई
मागील काही दिवसांपासून अभ्यासकांनी नोंदवलेल्या भाकीताच्या दिशेने शेअर बाजाराचा प्रवास सुरु असल्याचे सध्या पहावयास मिळत आहे. यामध्ये सेन्सेक्सचा टप्पा लवकरच 50 हजारच्यावर राहणार असल्याचे संकेत विविध विश्लेषकांनी नमूद केले होते. याचाच सकारात्मक भाग म्हणून चालू आठवडय़ाच्या प्रारंभापासून सेन्सेक्स 49,500 च्या टप्प्यावर कार्यरत आहे. चालू आठवडय़ातील पहिल्या दिवशी सोमवारी व मंगळवारीही तेजी कायम राहिली आहे.
दिवसभरातील कामगिरीनंतर बीएसई सेन्सेक्सने 248 अंकांनी वधारुन नवा विक्रम प्राप्त केला आहे. यामध्ये बाजाराला जागतिक पातळीवरील सकारात्मक संकेत आणि विदेशी संस्थांच्या गुंतवणुकीच्या मजबूत प्रवाहामुळे सेन्सेक्स 50 हजारकडे झेप घेत आहे. दिवसअखेर सेन्सेक्स 247.79 अंकांनी वधारुन निर्देशांक 49,517.11 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 78.70 अंकांसह निर्देशांक 14,563.45 वर स्थिरावला आहे.
दिग्गज कंपन्यांमध्ये सर्वाधिक नफा कमाईत भारतीय स्टेट बँकेचे समभाग 4 टक्क्यांनी मजबूत राहिले आहेत. यासोबतच भारती एअरटेल, रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक, आयटीसी, ऍक्सिस बँक आणि एनटीपीसीचे समभाग लाभात राहिले आहेत. दुसऱया बाजूला एशियन पेन्ट्स, हिंदुस्थान युनिलिव्हर, नेस्ले इंडिया, टायटन आणि कोटक बँक यांच्या समभागांचा मात्र घसरणीत समावेश राहिला आहे.
भारतीय रिझर्व्ह बँक यांच्याकडून आर्थिक स्थिरतेबाबत एक अहवाल केला आहे, यामुळे बँकेकडून व्यक्त करण्यात आलेल्या चिंतेच्या प्रभावाने प्रारंभीच्या काळात शेअर बाजारात घसरण राहिली होती. परंतु काही काळातच शेअर बाजार सावरल्याने सेन्सेक्सने नवीन उच्चांक प्राप्त केला.
तिमाही अहवालाचा प्रभाव
तिसऱया तिमाहीचे कंपन्यांचे नफा कमाईचे अहवाल सादर होण्याच्या शक्यतेमुळे शेअर बाजार मजबूत स्थितीत प्रवास करीत आहे.