सेन्सेक्स 612 तर निफ्टी 184 अंकांनी वधारला
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवडय़ातील तिसऱया सत्रात बुधवारी भारतीय भांडवली बाजारात तेजीचा माहोल कायम राहिल्याचे पहावयास मिळाले आहे. यामध्ये दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स 612 अंकांनी मजबूत होत बंद झाला आहे. दुसऱया बाजूला जागतिक पातळीवरील सकारात्मक कल राहिल्याने याचा लाभ भारतीय बाजाराला झाल्याचे दिसून आले आहे. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक आणि लार्सन ऍण्ड टुब्रो यांचे समभाग लाभात राहिले आहेत.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स 611.55 अंकांनी वधारुन निर्देशांक 56,930.56 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा 184.60 अंकांनी मजबूत होत निर्देशांक 16,955.45 वर बंद झाला आहे.
प्रमुख कंपन्यांमध्ये बजाज फायनान्सचे समभाग सर्वाधिक तीन टक्क्यांनी मजबूत राहिले असून अन्य कंपन्यांमध्ये भारती एअरटेल, सनफार्मा, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि स्टेट बँक यांचे समभागही तेजीसह बंद झाले आहेत. दुसऱया बाजूला विप्रो, आयटीसी आणि नेस्ले यांचे समभाग मात्र घसरणीसह बंद झाले आहेत.
विविध घडामोडींपैकी जागतिक बाजारातील सकारात्मक वातावरणामुळे भारतीय भांडवली बाजारात सकारात्मक वातावरण राहिले आहे. चौफेर झालेल्या उत्साही वातावरणामुळे बाजार मजबूतीसह बंद झाला आहे. मध्यम व लहान कंपन्यांच्या समभागातील सकारात्मक स्थितीचा फायदा बाजाराला घेता आला आहे. समभागातील घसरणीमुळे गुंतवणूक करण्यास चांगली संधी राहिली असल्याचेही यावेळी अभ्यासकांनी स्पष्ट केले आहे.
आशियातील अन्य बाजारांमध्ये हाँगकाँगचा हँगसेंग, जपानचा निक्की आणि दक्षिण कोरियाचा कॉस्पी हे लाभात होते, तर शांघाय कम्पोझिटचा निर्देशांक मात्र नुकसानीत राहिला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल 0.38 टक्क्यांनी वधारले आहे.