जागतिक वातावरणात सकारात्मक कल – निफ्टीही मजबूत
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवडय़ात दुसऱया दिवशी मंगळवारी भारतीय शेअर बाजारात तेजी कायम राहिल्याचे पहावयास मिळाले होते. जागतिक पातळीवरील सकारात्मक संकेतामुळे एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि बजाज फिनसर्व्ह यांचे समभाग मजबूत राहिल्याने सेन्सेक्सने 403 अंकांचा टप्पा पार करत नवा उच्चांक प्राप्त केला आहे.
दिग्गज कंपन्यांमध्ये बजाज फिनसर्व्हचे समभाग सर्वाधिक आठ टक्क्यांनी मजबूत स्थितीत राहिले आहेत. यासोबत टाटा स्टील, टेक महिंद्रा, बजाज फायनान्स, एचडीएफसी बँक आणि स्टेट बँक यांचे समभाग वधारले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये नेस्ले इंडिया, इन्फोसिस, एचडीएफसीसह एचसीएल टेकच्या समभागात घसरण झाली आहे.
मंगळवारच्या सत्रात बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 403.19 अंकांनी वधारुन मागील कामगिरीच्या तुलनेत नवी झेप घेत निर्देशांक 55,958.98 वर बंद झाला आहे. यासह दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 128.15 अंकांच्या तेजीसोबत निर्देशांक 16,624.60 वर बंद झाला आहे.
मुख्य क्षेत्रांची कामगिरी
भारतीय शेअर बाजारातील स्थिती ही मागील काही दिवसांपासून नव्या विक्रमाचा प्रवास करत असल्याचे पहावयास मिळत आहे. या सुधारणात्मक स्थितीत जागतिक सकारात्मक कल राहिल्याने धातू, बँकिंग आणि रियल्टीचे समभाग तेजीत राहिले होते.
अन्य घडामोडींचा प्रभाव
देशात कोरोनाच्या दुसऱया लाटेच्या प्रभावामधून मिळणारा दिलासा व त्याच्यासोबत लसीकरणाचा वाढता वेग यामुळे भारतीय बाजार मजबूत होत आहे. यामध्ये अमेरिकेकडून फायझर आणि बायोएनटेकच्या कोविड 19 लसीला मंजुरी मिळाल्याने आगामी काळात कोरोना प्रतिबंधक लसीकरण वेग घेणार असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सहा लाख कोटी रुपयाच्या एनएमपी या योजनेचा प्रभाव भारतीय बाजारावर राहिला होता.