आयटी क्षेत्रातील कंपन्यांच्या समभाग विक्रीचा परिणाम
वृत्तसंस्था/ मुंबई
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील (आयटी) कार्यरत असणाऱया कंपन्यांच्या समभागांची जोरदार विक्री झाल्यामुळे चालू आठवडय़ातील तिसऱया सत्रात बुधवारी पुन्हा घसरणच अनुभवायला मिळाली. यामध्ये प्रारंभीची तेजी गमावत दिवसअखेर सेन्सेक्स 300 पेक्षा अधिक अंकांनी प्रभावीत होत बंद झाला आहे.
प्रमुख कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स 303.35 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 53749.26 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 99.35 अंकांनी घसरुन निर्देशांक 16,025.80 वर बंद झाल्याचे दिसून आले. सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 12 समभाग तेजीसह बंद झाले तर 18 समभाग घसरणीसह बंद झाले. आयटी आणि ऑटो कंपन्यांच्या समभागांची विक्री झाल्याचे दिसले. निफ्टीत आयटी निर्देशांक 2.5 टक्के घसरला होता.
सेन्सेक्समधील कंपन्यांमध्ये एशियन पेन्ट्स, टीसीएस, विप्रो, टेक महिंद्रा, लार्सन ऍण्ड टुब्रो, इन्फोसिस, भारतीय स्टेट बँक, एचसीएल टेक आणि महिंद्रा ऍण्ड महिंद्रा यांचे समभाग सर्वाधिक नुकसानीत राहिले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये एनटीपीसी, भारती एअरटेल, एचडीएफसी, कोटक महिंद्रा बँक, नेस्ले, आयसीआयसीआय बँक आणि आयटीसी यांचे समभाग तेजीसह बंद झाले आहेत.
आशियातील अन्य बाजारांमध्ये चीनचा शांघाय कम्पोझिट, दक्षिण कोरियाचा कोस्पी आणि हाँगकाँगचा हँगसेंग लाभासह बंद झाले आहेत. तर जपानचा निक्की घसरणीसह बंद झाला. याच दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल 115.1 डॉलर प्रति बॅरेलवर पोहोचले आहे.
विदेशी गुंतवणूकदारांकडून देशातील शेअर बाजारातून मंगळवारी 2,393.45 कोटी रुपयांच्या समभागांची विक्री झाली आहे. अभ्यासकांच्या मते गुंतवणूकदारांना अमेरिकेत मंदी येण्याची भीती असल्याने जागतिक बाजारांमध्ये नकारात्मक कल निर्माण होत असल्याचे संकेत आहेत.