निफ्टीतही घसरण – फार्मा क्षेत्र सर्वाधिक नुकसानीत
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारात चालू आठवडय़ातील तिसऱया सत्रात बुधवारी सेन्सेक्स 257 अंकांच्या घसरणीसोबत बंद झाला आहे. यामध्ये अमेरिकन फेडरल रिझर्व्हची व्याजदरासंदर्भात घोषणा करण्याच्या अगोदरच जागतिक बाजारात नरमाईचा कल राहिला होता. याचदरम्यान देशातील बाजारात मजबूत स्थिती कायम असताना एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि कोटक बँक यांचे समभाग नुकसानीसह बंद झाले आहेत.
तीस समभागावर आधारीत कामगिरी करणारा सेन्सेक्स दिवसअखेर 257.14 अंकांनी घसरुन निर्देशांक 59,771.92 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 59.75 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 17,829.20 वर बंद झाला आहे.
सर्वाधिक नुकसानीत फार्मा
सेन्सेक्समधील कामगिरीत जवळपास तीन टक्के इतक्या घसरणीसोबत सन फार्मा सर्वाधिक नुकसानीत राहिला आहे. यासोबतच इंडसइंड बँक, भारती एअरटेल, कोटक बँक, आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी बँक यांचे समभाग नुकसानीत राहिले. दुसऱया बाजूला लार्सन ऍण्ड टुब्रो, एशियन पेन्ट्स. अल्ट्राटेक सिमेंट, स्टेट बँक आणि बजाज फायनान्स यांचे समभाग लाभात राहिले आहेत. आशियातील अन्य बाजारांमध्ये चीनचा शांघाय कम्पोझिट, हाँगकाँगचा हँगसेंग आणि दक्षिण कोरियाचा कोस्पी नुकसानीत राहिला आहे.
का आली घसरण
बाजारात सुधारणात्मक स्थिती असतानाही जागतिक पातळीवरील प्रमुख घडामोंडीच्या परिणामुळे भारतीय बाजार नुकसानीत राहिला आहे. यामध्ये अमेरिकन फेडरलकडून सादर करण्यात आलेल्या व्याजदरासह अन्य घडामोडींचाही परिणाम झाला आहे. अमेरिकेने भविष्यात बॉण्ड खरेदीच्या कार्यक्रमाची घोषणा करण्याचे संकेत आहेत. यासोबतच नकारात्मक स्थितीचा परिणाम भारतीय बाजारावर राहिल्याचे पहावयास मिळाले आहे.