चौफेर नफा कमाईचा परिणाम : निफ्टीत 271.40 अंकांची घसरण
वृत्तसंस्था / मुंबई
चालू आठवडय़ात मंगळवारी प्रजासत्ताकदिनानिमित्त शेअर बाजार बंद राहिला होता, परंतु एक दिवसाच्या विश्रांतीनंतर शेअर बाजारात बुधवारी चौफेर विक्रीच्या परिणामामुळे तब्बल 938 अंकांनी सेन्सेक्स कोसळला आहे. यामध्ये दिवसभरातील कामगिरीनंतर अंतिम क्षणी नफा कामाईसोबत सेन्सेक्स बंद झाला आहे.
शेअर बाजारात सलग चौथ्या सत्रात शेअर बाजारात नकारात्मक सूर राहिला आहे. बुधवारी दिवसअखेर सेन्सेक्स 937.66 अंकांनी घसरुन निर्देशांक 47,409.93 वर बंद झाला. एकूण चार सत्रांमध्ये 2,382.19 म्हणजे 4.78 टक्क्यांची घसरण राहिलेली आहे. या प्रकारे राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टी दिवसअखेर 271.40 अंकांनी घसरुन निर्देशांक 13,967.50 वर बंद झाला आहे. आतापर्यंत चार सत्रात एकूण जवळपास 677.20 अंकांनी म्हणजे 4.62 टक्क्यांचा फटका बसला आहे.
दिग्गज कंपन्यांमध्ये दिवसअखेर ऍक्सिस बँक, टायटन, इंडसइंड बँक, एचडीएफसी बँक, डॉ. रेड्डीज लॅब, एचडीएफसी आणि एशियन पेन्ट्स यांचा समावेश घसरणीत राहिला आहे. सेन्सेक्समध्ये 30 समभागात 24 नुकसानीत राहिले असून 6 लाभात राहिले आहेत.
उपलब्ध आकडेवारीनुसार विदेशी गुंतवणूकदारांनी निव्वळ स्वरुपात 765.30 कोटी रुपये मूल्याचे समभाग विक्री केले आहेत. दुसऱया बाजूला आशिया आणि अन्य बाजारात मिळता जुळता कल राहिला आहे. गुंतवणूकदार सतर्क राहिल्याने शेअर बाजारात उच्चांकी पातळीवर नफा कमाईची नेंद करण्यात आल्याचा प्रभाव आगामी काळातही कायम राहण्याचे संकेत अभ्यासकांनी व्यक्त केले आहेत.
नफा कमाई तेजीत
विश्लेषकांच्या माहितीनुसार आगामी सप्ताहात सादर होणाऱया अर्थसंकल्पामुळे शेअर बाजारावर परिणाम दिसतो आहे. मोठय़ा प्रमाणात नफा कमाईच्या प्रभावाने भारतीय शेअर बाजार बुधवारी
कोसळला असल्याचे पहावयास मिळाले आहे. आणखी काही दिवस दबाव राहिल, असे दिसते.