ओटवणे / प्रतिनिधी:
चराठा येथील सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक प्रकाश गुंडू बिर्जे (६३) यांचे बुधवारी २५ ऑगस्ट रोजी मध्यरात्री गोवा धारगळ येथील रेडकर हॉस्पिटलमध्ये निधन झाले. गेले काही दिवस ते आजारी होते. त्यांची तब्येत अचानक खालावल्यामुळे सोमवारी त्यांना रेडकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले. प्रकाश बिर्जे यांनी पोलीस खात्यात पोलीस कर्मचारी, हेड कॉन्स्टेबल, हवालदार, पोलीस उपनिरीक्षक या पदावर बांदा, दोडामार्ग, सावंतवाडी, निवती, वेंगुर्ले या पोलिस स्थानकामध्ये सेवा बजावली. सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी संघटनेच्या सावंतवाडी तालुक्याचे ते अध्यक्ष होते. चराठा गावच्या धार्मिक, शैक्षणिक व सामाजिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. चराठा देवस्थानचे ते मानकरी व चराठा स्थानिक देवस्थान कमिटीचे ते सदस्य होते. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे दर्शन घेऊन बिर्जे कुटुंबियांचे सांत्वन केले. गुरुवारी दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, सून, बहिणी, भावोजी असा परिवार आहे. भोसले पॉलीटेक्निक कॉलेजच्या विद्यार्थी वसतिगृहाचे सुपरवायझर प्रशांत बिर्जे तसेच स्वप्निल आणि विजय बिर्जे यांचे ते वडील होत.