प्रतिनिधी / म्हापसा
सोनारभाट-सांळगांव येथील खुल्या जागेत अज्ञाताकडून बेकायदा उभारण्यात येत असलेले बांधकाम स्थानिक लोकांनी हाणुन पाडले. यावेळी सांळगांव पंचायतीच्या सरपंच लाफीरा गोम्स तसेच अन्य पंचायत सदस्य उपस्थित होते. दरम्यान, या आधीही याच जागेत ( सर्व क्रमांक ः 183/6 ) बेकायदा शेड्स उभारण्याचा प्रयत्न झाला होता.
दरम्यान, लॉकडाऊनच्या पाश्वभुमीवर सरकारी यंत्रणा इतरत्र मग्न असल्याची संधी साधुन रविवारी सकाळी येथील सोनारभाट परिसरात स्थानिक कामगारांच्या मदतीने पक्के बांधकाम होत असल्याचे लक्षात येताच जागृत नागरिकांनी घटनास्थळी धांव घेतली व सदरचे बांधकाम बंद ठेवण्यासाठी संबंधित व्यक्तीला सुचित केले परंतु लोकांच्या सुचनेला कान न देतां संबंधित व्यक्तीने बांधकाम चालुंच ठेवल्याने खवळलेल्या ग्रांमस्थांनी तात्काळ स्थानिक पंचायतीला याबाबतीत माहिती दिली .
सांळगांव पंचायतीच्या सरपंच लाफीरा गोम्स तसेच इतर पंचायत सदस्यांनी घटनास्थळी धांव घेत संबंधित बांधकाम करणाऱया व्यक्तीकडे बांधकामासंदर्भात कागदपत्रांची मागणी केली असता त्यांनी तेथील बांधकामा संदर्भात कागदपत्रे सादर करण्यास नकार दिला, यावेळी पंचायत मंडळ तसेच संबंधित बांधकाम करणार्या व्यक्तीमध्ये बराचवेळ शाब्दकि चकमक उडाली. दरम्यान, संबंधित बांधकाम कर्त्याकडून याच जागेत बेकायदा दोन शेड्स उभारण्यात आलेल्या आहेत याबाबतीत स्थानिक पंचायतकडुन त्यांना नोटीसा बजावण्यात आलेल्या आहेत मात्र सदरचे बांधकाम अद्याप पाडण्यात स्थानिक पंचायतीला यश आलेले नसुन स्थानिक सेव्ह- सालीगांव संघटणेचे अध्यक्ष रमेश घाडी यांनी यापुढे अशा प्रकारची बेकायदा बांधकामे आता स्थानिक लोकांकडूनच भुईसपाट करण्यात येणार असल्याचा इशारा दिला
. तथापि, स्थानिक आर्किटेक्ट नोयल डिसौझा यांनीही स्थानिक पंचायत तसेच नगर नियोजन विकास प्राधिकरणाला न जुमानता गावात होऊं घातलेल्या बांधकामांना स्थानिक जनता यापुढे प्रकर्षाने विरोध करणार असल्याचे स्थानिक प्रतिनिधींशी बोलतांना सांगितले. तथापि, रविवारी सकाळी सुरु झालेला हा वाद दुपारपर्यंत चालला असतांनाही स्थानिक पोलिस शेवटपर्यंत घटनास्थळी पोहोचले नव्हते त्यामुळे स्थांनिकांनी पोलिसांच्या हलगर्जीपणाबद्दल संताप व्यक्त केला.