वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सोमवारचा दिवस वायदेबाजारामध्ये सोन्यासाठी ‘चांदी’चा ठरला. गुरुवारच्या सर्वोच्च 45201 रुपये या दरामध्ये प्रतीतोळा 753 रुपयांची उसळी घेत हा दर 45954 झाला. सोन्याच्या दराचा हा आजपर्यंतचा सर्वोच्च उच्चांक ठरला आहे.
तर चांदीच्या दरातही सुमारे 270 रुपयांची वाढ झाली. आता हा दर प्रतिकिलो 42990 रुपये झाला आहे. सोमवारी वायदे बाजार सुरू होताच सोने आणि चांदीच्या दराने चांगलीच उसळी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन सुरू आहे आणि दिल्लीसह अनेक ठिकाणचे सराफा बाजार बंद आहेत. तरीही ही वाढ नोंदवली गेली आहे. लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याचे संकेत मिळाल्यावर गुंतवणूकदारांकडून सोन्याचांदीमध्ये गुंतवणुकीला प्राधान्य दिल्याचे दिसत आहे.