जिल्हाधिकाऱयांचा आदेश : दुकाने उघडण्यासही निर्बंध
प्रतिनिधी /बेळगाव
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र, कर्नाटकसह विविध राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील यल्लम्मा देवीचे मंदिर दर्शनासाठी अद्याप बंदच आहे. जिल्हाधिकाऱयांनी रविवारी यासंबंधी एक आदेश बजावला असून यल्लम्मादेवी व जोगुळभावी सत्यम्मादेवीचे दर्शन बंदच ठेवण्याचा आदेश दिला आहे.
गेल्या अठरा महिन्यांपासून या मंदिरात दर्शन बंद ठेवण्यात आले आहे. पहिल्या कोरोना लाटेनंतरच्या अनलॉकच्यावेळी केवळ 21 दिवस मंदिर उघडे ठेवण्यात आले होते. दुसरी लाट सुरू झाल्यामुळे पुन्हा देवदर्शन बंद ठेवण्यात आले होते. आता देवीचे दर्शन तर बंदच शिवाय मंदिर परिसरातील दुकाने उघडण्यासही निर्बंध लादण्यात आले आहेत.
यल्लम्मादेवी व जोगुळभावी सत्यम्मादेवीची रोजची पूजाअर्चा व धार्मिक विधी नेहमीप्रमाणे चालणार आहेत. त्यासाठीही कोरोना नियमांचे पालन करावे लागणार आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱयांवर कारवाई करण्याचा इशाराही जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी दिला आहे. खासकरून डेल्टा प्लसचा धोका लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय दंडप्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये देवदर्शन बंद ठेवण्याबरोबरच परिसरातील दुकानेही बंद ठेवण्याचा आदेश बजावण्यात आला आहे. डेल्टा प्लसचा फैलाव वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे भाविकांच्या आरोग्याचे हित लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा पोलीसप्रमुख, प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्यावर या आदेशाच्या अंमलबजावणीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.