वृत्तसंस्था/ सना
सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील आघाडी सैन्याने रविवारी येमेनची राजधानी सनामध्ये हूती नियंत्रित सैन्यठिकाणांवर अनेक हवाई हल्ले केले आहेत. यापूर्वी इराणचे समर्थनप्राप्त हुती बंडखोरांनी सौदी अरेबियावर क्षेपणास्त्र आणि ड्रोनने हल्ला केला होता. याच्याच प्रत्युत्तरादाखल हे हवाई हल्ले करण्यात आले आहेत. येमेनमधील गृहयुद्धापासून इराणचे समर्थन प्राप्त हुती बंडखोरांनी उत्तर येमेनच्या अनेक प्रांतांवर नियंत्रण मिळविले आहे. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त अध्यक्ष अब्द रब्बू मंसूर हादी यांना राजधानीतून पिटाळून लावले आहे.
सौदीच्या नेतृत्वाखालील अरब आघाडीने 2015 मध्ये येमेनमधील संघर्षात हस्तक्षेप करत हादी सरकारला पाठिंबा दिला होतो. येमेनमधील हुती बंडखोरांच्या हल्ल्यांमुळे सौदी अरेबिया त्रस्त आहे. तेलविहिरी आणि पेट्रोलियम प्रकल्पांवर सातत्याने होत असलेल्या हल्ल्यांनी त्रस्त युवराज सलमान यांनी ब्रिटिश सैन्याची मदत घेतली आहे. ब्रिटिश सैन्याची 16 वी रेजिमेंट रॉयल आर्टिलरीच्या गनरला सौदी अरेबियाच्या तेलविहिरींच्या क्षेत्रात तैनात करण्यात आले आहे.
ब्रिटिश सैन्य आले धावून
14 सप्टेंबर 2019 रोजी सौदी अरेबियाच्या तेलउत्पादन सुविधांवरील हल्ल्यानंतर ब्रिटनने सौदी अरेबिया संरक्षण मंत्रालय आणि अनेक आंतरराष्ट्रीय सहकाऱयांसोबत मिळून काम केले आहे. यादरम्यान हवाई धोक्यांपासून स्वतःच्या महत्त्वाच्या आर्थिक ठिकाणांची सुरक्षा बळकट करण्याचे धोरण अंगिकारण्यात आले आहे.