क्रीडा प्रतिनिधी / मडगाव
होळकर स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या मुश्ताक अली टी-20 क्रिकेट स्पर्धेत गोव्याला दुसरा पराभव स्वीकारावा लागला. काल खेळविण्यात आलेल्या सामन्यात अवी बारोटने केवळ 53 चेंडूत ठोकलेल्या 122 धावांच्या बळावर सौराष्ट्रने गोव्याचा तब्बल 90 धावांनी दारूण पराभव केला.
गोव्याने या स्पर्धेत आपल्या सलग तिसऱया सामन्यात नाणेफेक जिंकली. गोव्याने या सामन्यात एक बदल करताना अमोघ देसाईच्या स्थानावर वैभव गोवेकरला संधी दिली. प्रथम फलंदाजी करण्याचे निमंत्रण दिल्यानंतर सौराष्ट्रने निर्धारीत 20 षटकात 5 बाद 215 धावा केल्या. अवी बारोटने केवळ 53 चेंडूत धावचित होण्यापूर्वी 122 धावांची खेळी करताना अकरा चौकार व सात षटकार मारले. त्याने समर्थ व्यास समवेत दुसऱया विकेटसाठी 59 चेंडूत 111 धावांची भागीदारी केली.
गोव्याच्या दिपराज गावकरच्या चार षटकात 63 धावा सौराष्ट्रने चोपल्या तर कप्तान अमित वर्माच्या एकाच षटकात 17 धावा निघाल्या. या सामन्यातही दर्शन मिसाळ आणि अशोक दिंडाने गोलंदाजीत सातत्य राखले. दिंडाने दोन तर लक्षय गर्गने एक गडी बाद केला.
उत्तरादाखल, गोव्याचा डाव सौराष्ट्रच्या प्रभावी गोलंदाजीसमोर 18.4 षटकात केवळ 125 धावात संपला. अमोघच्या स्थानावर संधी देण्यात आलेला वैभव गोवेकर शून्यावर बाद झाला. त्यानंतर ठराविक अंतराने गोव्याचे फलंदाज बाद झाले. सौराष्ट्रसाठी जयदेव उनाडकट व चिराग जानी यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. गोवा आपला स्पर्धेतील चौथा लीग सामना 17 रोजी राजस्थानविरूद्ध खेळेल.