वृत्तसंस्था / पॅरिस
सेव्हिले येथे झालेल्या सामन्यात स्पेनने जर्मनीवर 6-0 असा दणदणीत विजय मिळवित युफा नेशन्स लीग फायनल्ससाठी पात्रता मिळविली. त्याचप्रमाणे फ्रान्सनेही फायनल्स स्पर्धेसाठी पात्रता मिळविताना स्वीडनचा 4-2 असा पराभव केला. स्पेनच्या विजयात फेरान टोरेसच्या हॅट्ट्रिकचा समावेश असून गेल्या 89 वर्षातील जर्मनीचा हा सर्वात नामुष्कीजनक पराभव ठरला आहे. जर्मनीचे प्रशिक्षक जोआकिम लू यांनाही या पराभवाने धक्का बसला असून त्यांच्याबद्दलही शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या आहेत.
मँचेस्टर सिटीचा फॉरवर्ड टोरेस हा स्पेनच्या विजयाचा शिल्पकार ठरला. या सामन्यात उतरण्यापूर्वी जर्मनीचे प्रशिक्षक जोआकिम लू यांच्यावर बरेच दडपण होते. या लाजिरवाण्या पराभवामुळे आता त्यांच्या कुवतीबद्दलही शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या असून त्यांनी घेतलेले बरेचसे निर्णय चुकल्याची टीकाही सुरू झाली आहे. ‘आमच्यासाठी हा काळा दिवस आहे,’ अशी कबुली लू यांनी सामन्यानंतर दिली. यापूर्वी 1931 मध्ये जर्मनीला ऑस्ट्रियाकडून 6-0 असा सर्वात मोठा पराभव स्वीकारावा लागला होता. येथील सामन्यात उतरताना जर्मनीने लीग अ, गट 4 मध्ये अग्रस्थान मिळविले होते आणि स्पेनपेक्षा फक्त एका गुणाने ते पुढे होते. त्यामुळे पुढील वर्षी ऑक्टोबरमध्ये होणाऱया फायनल्स स्पर्धेसाठी पात्र होण्याकरिता त्यांना हा सामना अनिर्णीत राखणे पुरेसे ठरणार होते.
पण अल्वारो मोराटाने 17 व्या मिनिटाला हेडरद्वारे गोल करून स्पेनला आघाडी मिळवून दिल्यानंतर टोरेसने 33 व्या मिनिटाला दुसरा गोल नोंदवला. डॅनी ओल्मोचा हेडर बारला लागून परतल्यानंतर टोरेसने त्यावर ताबा घेत हा गोल केला. पूर्वार्ध संपण्याआधी रॉड्रीने हेडरवर स्पेनची आघाडी 3-0 अशी केली. या सत्रात सर्जिओ कॅनालेस व कर्णधार सर्जिओ रॅमोस यांना दुखापत झाल्याने त्यांना बाहेर पडावे लागले. पण अशा स्थितीतही स्पेनने उत्तरार्धात आणखी तीन गोल नोंदवत जर्मनीला अत्यंत नामुष्कीजनक पराभवाला सामोरे जाण्यास भाग पाडले. 55 व्या मिनिटाला जोस गयाच्या पासवर टोरेसने संघाचा चौथा आणि नंतर फॅबियन रुइझने पुरविलेल्या चेंडूवर टोरेसने संघाचा पाचवा गोल नोंदवत आपली हॅट्ट्रिकही पूर्ण केली. बदली खेळाडू म्हणून उतरलेल्या मिकेल ओयारझाबलाने स्पेनचा अखेरचा गोल नोंदवत जर्मनीचे आव्हान संपुष्टात आणले.
फायनल्ससाठी पात्र ठरणारा स्पेन हा दुसरा संघ असून फ्रान्सने याआधीच पोर्तुगालचा पराभव करून पात्रता मिळविली आहे. लीग अ, गट 3 मधील शेवटच्या सामन्यात फ्रान्सने स्वीडनचा 4-2 असा पराभव केला. ऑलिव्हियर गिरोडने पुन्हा एकदा चमकदार प्रदर्शन करीत 2 गोल नोंदवले. याशिवाय बेंजामिन पॅव्हर्ड, किंग्सले कोमन यांनी एकेक गोल नोंदवले. स्वीडनचे गोल व्हिक्टर क्लाएसन व रॉबिन कायसन यांनी केले. गिरोडने आतापर्यंत 44 गोल नोंदवत प्लाटिनीचा 41 गोलांचा विक्रम याआधीच मागे टाकला आहे. फ्रान्सच्या थिएरी हेन्रीच्या नावावर सर्वाधिक 51 गोलांचा विक्रम आहे.