भारतीयांना मागे टाकून सुवर्णपदक पटकाविले, स्वतःच्या देशात देणार संस्कृतचे धडे
जगभरातील ज्ञान प्राप्त करण्याची इच्छा असल्यास भारतातील प्राचीन भाषा संस्कृत आत्मसात करावी असे सातासमुद्रापलिकडील युरोपीय देश असलेल्या स्पेनच्या मारियाचे सांगणे आहे. वाराणसीचय संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठातून मारियाने संस्कृतमध्ये ‘पूर्व मीमांसा’ विषयातून ‘आचार्य’ पदवी प्राप्त करण्यासह भारतीय विद्यार्थ्यांना मागे टाकून विद्यापीठात पहिला क्रमांक मिळविला आहे. मारियाला मंगळवारी उत्तरप्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी सुवर्णपदक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविले आहे.
मारिया हिने संस्कृत विद्यापीठातून मीमांसा विषयातून आचार्य (पदव्युत्तर) शिक्षण घेतले आहे. मीमांसा अत्यंत कठीण विषय मानला जातो. विद्यापीठाच्या इतिहासात मीमांसाच्या जागा कधीच पूर्णपणे भरल्या गेलेल्या नाहीत.
सुमारे 12 वर्षांपूर्वी भारतीय संस्कृती समजून घेण्यासाठी ती ऋषिकेश आणि वाराणसीत आली होती. वाराणसीच्या संस्कृतीने तिले प्रचंड प्रभावित केले होते. तेथून स्पेनमध्ये गेल्यावर संस्कृतचे शिक्षण घेण्याचा निर्णय घेत ती 2012 मध्ये पुन्हा वाराणसीत दाखल झाली. विद्यापीठातील संस्कृतच्या अभ्यासक्रमात प्रवेश घेत तिने या दिशेने पहिले पाऊल टाकले होते.
प्रारंभी संस्कृत समजून घेण्यास मोठी अडचण झाली. पण हळूहळू संस्कृत चांगल्याप्रकारे समजू लागल्याचे सांगणारी मारिया आता पूर्णपणे संस्कृतमधून संभाषण करते. संस्कृतमधून पीएचडी करत जगभराचा या भाषेचा प्रसार करण्याची तिची इच्छा आहे.