क्रीडा प्रतिनिधी / मडगाव
एफसी गोवा संघ व्यवस्थापनाने संघाच्या स्ट्रँग्थ आणि कंडीशनिंग प्रशिक्षकपदी स्पेनच्या झेवियर गोन्झालेझची नियुक्ती केली आहे. येत्या आयएसएल फुटबॉल मोसमात आणि एफसी गोवाच्या एएफसी चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या मोहिमेत झेािrवयर गोन्झालेझ मुख्य प्रशिक्षक जुआन फॅर्रांडोच्या प्रशिक्षण स्टाफला सहकार्य करतील.
आयएसएल फुटबॉल स्पर्धेंत सर्वांत यशस्वी संघ असलेल्या एफसी गोवा संघात सामिल झाल्याने झेवियर गोन्झालेझने आनंद व्यक्त केला. प्रशिक्षक जुआन फॅर्रांडो आणि संघातील फुटबॉलपटूंसमवेत मी काम करण्यास आतुर झालो आहे, असे झेवियर म्हणाला.
स्ट्रँग्थ आणि कंडीशनिंग प्रशिक्षकपदी झेवियरची नियुक्ती केल्यामुळे मुख्य प्रशिक्षक जुआन यांनीही क्लब व्यवस्थापनाचे आभार मानले आहे. एफसी गोवा संघासाठी झेवियरची नियुक्ती मोलाची असल्याचे जुआन यावेळी म्हणाले. जगभरातील विविध नामवंत फुटबॉल क्लबांसमवेत झेवियरने काम केले असून त्याला खेळाडूंच्या सराव आणि त्यांना आवश्यक असलेल्या सर्व तांत्रिक बाबींविषयी ज्ञान असल्याचे फॅर्रांडो यावेळी म्हणाले.
सध्या ऑफ-सीझन लांबला आहे. त्यामुळे स्पर्धेपूर्वीचा कमी वेळेतील सराव मोसम मोलाचा ठरणार आहे. झेवियरचे खेळाडूंसाठी स्ट्रँग्थ आणि कंडीशनिंग शिबीर एफसी गोवाच्या खेळाडूंना तंदुरूस्त ठेवण्यासाठी खुपच उपयुक्त असून आमच्या सर्व फुटबॉलपटूंना झेवियरच्या अनुभवाचा चागंला फायदा मिळेल, असे फॅर्रांडो म्हणाले.
स्ट्रँग्थ आणि कंडीशनिंग प्रशिक्षक म्हणून झेवियरला आठ वर्षांचा अनुभव आहे. ला-लीगामध्ये त्याने रियल वाल्लाडोलीड तसेच यूईएफए युरोप लीगच्या पात्रता फेरीत सायप्रीयनच्या एईके लार्नाका या संघाला आपली सेवा दिली होती. हल्लीच त्याने 2022 फिफा विश्वचषक फुटबॉल पात्रता मोहिमेत झेवियरने तैवानच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाचे स्पोर्ट्स पर्फोमन्स एरियाचे संचालक म्हणून काम केले आहे.