जगभरात कोरोनामुळे 2,03,684 जणांचा मृत्यू : रशियातील रुग्णांचा आकडा 80 हजारांपेक्षा अधिक
जगात कोरोना विषाणूची आतापर्यंत 29 लाख 34 हजार 651 जणांना लागण झाली आहे. तर 2 लाख 03 हजार 684 जणांचा मृत्यू झाला आहे. यातही दिलासा वाटणारी बाब म्हणजे 8 लाख 40 हजार 766 जणांनी कोरोनावर मात केली आहे. स्पेनमध्ये टाळेबंदीच्या 6 आठवडय़ांनी पहिल्यांदाच मुलांना घराबाहेर पडण्याची अनुमती मिळाली आहे. तेथे 14 वर्षांपर्यंतची मुले 1 तासांपर्यंत प्रौढाच्या देखरेखीत खेळू शकतात. तर रशियातील ऑफिशियल क्रायसिस रिस्पॉन्स सेंटरने मागील 24 तासांत 6361 रुग्ण मिळाल्याचे सांगत 66 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. रशियातील रुग्णांचा एकूण आकडा आता 80,949 वर पोहोचला आहे. तर 747 जणांना जीव गमवावा लागला आहे.
अमेरिकेत दिवसात 2494 बळी
अमेरिकेत 24 तासांत 2,494 जणांना जीव गमवावा लागला आहे. पक्षपाती प्रसारमाध्यमे शत्रुत्वपूर्ण प्रश्नांशिवाय काही विचारत नसल्याने पत्रकार परिषदेला कुठलाच उद्देश राहत नाही. अशा प्रकारातून प्रसारमाध्यमांना केवळ मानांकन मिळते, परंतु नागरिकांना बनावट वृत्ताशिवाय काहीच गवसत नसल्याचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.
क्यूबाची आफ्रिकन देशांना मदत
महामारीच्या प्रारंभापासून क्यूबाने अनेक देशांना वैद्यकीय पथके पाठवून मदत केली आहे. क्यूबाने शनिवारी दक्षिण आफ्रिकेत 216 आरोग्य कर्मचाऱयांचे पथक पाठविले आहे. क्यूबा सरकारने इटली, मेक्सिको, अंगोला, जमैका, व्हेनेझुएला समवेत 19 देशांमध्ये आरोग्य कर्मचारी पाठविले आहेत. यात सुमारे 900 डॉक्टर्स तसेच परिचारिकांचा समावेश आहे.
चीनमधील वुहान कोरोनारुग्ण मुक्त
वुहानच्या सर्व रुग्णालयांमध्ये दाखल रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहितीच्या चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाचे (एनएचसी) प्रवक्ते मि फेंग यांनी रविवारी दिली आहे. चीनमध्ये शनिवारी 11 नवे रुग्ण सापडले आहेत. 11 दिवसांपासून चीनमध्ये कोरोनामुळे एकाचाही मृत्यू झालेला नाही. चीनमध्ये एकूण रुग्णांची संख्या 82,827 झाली असून 4,632 जणांना जीव गमवावा लागला आहे.
जॉन्सन कामावर परतण्यास तयार
ब्रिटनमध्ये मागील 24 तासांत 813 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण बळींचा आकडा 20 हजारांपेक्षा अधिक झाला आहे. पंतप्रधान बोरिस जॉन्सन कोरोनामुक्त झाल्याने सोमवारपासून स्वतःचे कामकाज पुन्हा सांभाळणार आहेत. लंडनच्या रुग्णालयात सुमारे 2 आठवडे त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या अनुपस्थितीत विदेशमंत्री डॉमिनिक रॉब त्यांचा कार्यभार सांभाळत होते.
जर्मनीत निदर्शकांना अटक
जर्मनीच्या पोलिसांनी बर्लिनमध्ये टाळेबंदीच्या विरोधात निदर्शने करणाऱया 10 पेक्षा अधिक जणांना अटक केली आहे. या निदर्शनांमध्ये 5 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. जर्मनी आणि पोलंडच्या सीमेवरही लोक निदर्शने करत आहेत. देशात 4 मेपासून शाळा सुरू होऊ शकतात. 30 एप्रिल रोजी चॅन्सेलर अँजेला मर्केल यासंबंधी निर्णय घेऊ शकतात. जर्मनीत आतापर्यंत 5,877 जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला असून 1,56,513 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
निधीची कमतरता भरून काढा
जी-20ने आंतरराष्ट्रीय पातळीवर महामारीच्या विरोधात लढण्यासाठी आरोग्य सुविधांची गरज पूर्ण करणे तसेच निधीची टंचाई दूर करण्याचे आवाहन केले आहे. जी-20 समूह 8 अब्ज डॉलर्सच्या निधीची कमतरता दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर उपचार, लसीसाठी निधीची गरज असल्याचे उद्गार जी-20 चे अध्यक्ष आणि सौदी अरेबियाच्या अर्थमंत्र्यांनी काढले आहेत.
जी-20चा अध्यक्ष या नात्याने सौदी अरेबियाने 50 कोटी डॉलर्स देण्याचे आश्वासन दिले आहे. अनेक देशांच्या सरकारांनी आणि संघटनांनी 1.9 अब्ज डॉलर्सचा निधी उपलब्ध केला आहे.
सौदी : संचारबंदी शिथिल
सौदी अरेबियात रविवारी संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे. काही व्यवसाय सुरू करण्यात आले आहेत. रमजानकाळात काही रिटेल स्टोअर खुले राहणार आहेत. परंतु मक्का येथे संचारबंदी लागू असणार आहे. सौदी अरेबियात 16 हजार 299 जणांना लागण झाली असून 136 जणांना जीव गमवावा लागला आहे. तेथील काही भारतीयांना कोरोनाची लागण झाली आहे.
कॅनडात 45 हजारांना लागण
कॅनडात मागील 24 तासांत 100 जणांना जीव गमवावा लागला आहे. एकूण रुग्णांची संख्या वाडून 45 हजार 300 झाली आहे. कॅनडात आतापर्यंत 2,465 जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. ओंटेरिया (800) आणि क्यूबेक (1440) या प्रांतांमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. कॅनडाच्या न्यू बेंसविक प्रांतातील निर्बंध हळूहळू हटविले जात आहेत. कामकाज पुन्हा सुरू होणारा कॅनडातील हा पहिलाच प्रांत ठरणार आहे.
अल्जीरियात 3,256 रुग्ण
अल्जीरियामध्ये शनिवारी 129 नवे रुग्ण सापडले आहेत. याचबरोबर एकूण बाधितांची संख्या वाढून 3,256 झाली आहे. तर दिवसभरात कोरोनामुळे 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तेथील एकूण मृतांचा आकडा वाढून आता 419 झाला आहे. ‘डिटेक्शन अँड फॉलो-अप कमिशन’चे प्रमुख जिमल फोरर यांनी यासंबंधी माहिती दिली आहे. अल्जीरियात पहिला रुग्ण 25 फेब्रुवारी रोजी आढळला होता. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी अल्जीरिया प्रशासनाने 29 एप्रिलपर्यंत देशव्यापी टाळेबंदी लागू केली आहे.
4 मेपासून इटलीत व्यवसायास प्रारंभ
इटलीत 4 मेपासून पुन्हा व्यवसायांना प्रारंभ होणार आहे. कोरोना संकटादरम्यान लागू करण्यात आलेली टाळेबंदी शिथिल करत निर्मितीक्षेत्र पुन्हा खुले केले जाणार आहे. तसेच सप्टेंबर महिन्यात इटलीतील शाळा सुरू करण्याची तयारी असल्याची माहिती पंतप्रधान ग्यूसेप कोंटे यांनी दिली आहे. उद्योगक्षेत्र सुरू करण्याशी संबंधित उपाययोजना चालू आठवडय़ात मांडल्या जाणार आहेत.
बांगलादेश : इस्कॉनमध्ये संसर्ग
बांगलादेशची राजधानी ढाका येथील इस्कॉन मंदिरात कोरोनाचे 31 रुग्ण सापडले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने हे मंदिर केले आहे. बांगलादेशात 5 हजार रुग्ण सापडले असून 140 जणांचा मृत्यू झाला आहे. स्वामीबाग भागात असलेल्या आंतरराष्ट्रीय कृष्णा भावना अमृत संघ (इस्कॉन) येथील आश्रमातील 31 सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे.