वृत्तसंस्था/ बार्सिलोना
मर्सिडिजचा चालक लेविस हॅमिल्टनने येथे झालेल्या स्पॅनिश ग्रां प्रि फॉर्म्युला वन शर्यतीत जेतेपद पटकावत कारकिर्दीतील 88 वे यश मिळविले. स्पेनमधील त्याचे हे पाचवे आणि सलग चौथ्या वर्षी मिळविलेले विक्रमी जेतेपद आहे. रेड बुलच्या मॅक्स व्हर्स्टापेनने दुसरे व हॅमिल्टनचा संघसहकारी व्हाल्टेरी बोटासने तिसरे स्थान मिळविले.
ड्रायव्हर्स चॅम्पियनशिप रेसमध्ये त्याने आता व्हर्स्टापेनवर 37 गुणांची आघाडी घेतली आहे. हॅमिल्टनने आतापर्यंत 156 वेळा पोडियमवर येत नवा विक्रम नोंदवला. याआधी मायकेल शुमाकरने 155 वेळा पोडियम फिनिश साधले हेते. रेसिंग पॉईंटच्या सर्जिओ पेरेझने चौथे, त्याचाच सहकारी लान्स स्ट्रोलने पाचवे व मॅक्लारेनच्या कार्लोस सेन्झने सहावे स्थान मिळविले. चार वेळचा चॅम्पियन फेरारीच्या सेबॅस्टियन व्हेटेलने सातवे, रेड बुलच्या ऍलेक्स अल्बॉनने आठवडे, अल्फा टॉरीच्या पियर गॅस्लीने नववे आणि मॅक्लारेनच्या लँडो नॉरिसने दहावे स्थान मिळविले.