शिवबसवनगर येथील प्रकार
प्रतिनिधी / बेळगाव
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत कोटय़वधी रुपये खर्च करून रस्त्यांची कामे करण्यात येत आहेत. शिवबसवनगर येथे याच योजनेंतर्गत केलेल्या रस्त्यावर तीन ठिकाणी भगदाड पडले असून या मार्गावरून ये-जा करणाऱयांसाठी ती धोकादायक ठरू लागली आहेत.
येथील पर्यावरणवादी कार्यकर्ते व निवृत्त प्राचार्य जी. के. खडबडी यांनी या संबंधी तरुण भारतकडे एका पत्रकाद्वारे माहिती दिली असून आर. एन. शेट्टी पॉलिटेक्निक कॉलेजपासून केपीटीसीएल भवनपर्यंत पडलेल्या या भगदाडांमुळे प्रवास करणे धोकादायक ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.
या मार्गावर रात्री विजेचा लपंडाव सुरू असतो. पथदीप काहीवेळा सुरू तर काहीवेळा बंद असतात. अंधारात या मार्गावरून जाताना नागरिक भगदाडात पडण्याचा धोका आहे. त्यामुळे संबंधितांनी या भगदाडांवर किमान झाकण बसविण्याची मागणी त्यांनी केली आहे. ही भगदाड उघडीच असून दुर्घटना घडण्याआधी प्रशासनाने याची दखल घेण्याची मागणी जी. के. खडबडी यांनी केली आहे.