’एक भारत, एक आरोग्य’ देशभरात एकसमान आरोग्य सेवा देणार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केंद्रीय अर्थसंकल्प 2022 मध्ये आरोग्य क्षेत्रासाठी केलेल्या तरतुदींवर आयोजित वेबिनारला संबोधित केले. यावेळी पीएम मोदी म्हणाले की, को-विन सारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे कोरोना लसीकरणातील आमच्या डिजिटल तंत्रज्ञानाची महती संपूर्ण जगाने ओळखल्याचा दाखला पंतप्रधानांनी दिला. तसेच आयुष्मान भारत, डिजिटल मिशन ग्राहक या सेवांमुळे देशात उपचार घेणे-देण सुकर होणार असल्याचे प्रतिपादनही त्यांनी केला. स्वच्छ भारत आणि फिट इंडिया ही दोन मुख्य ध्येये सरकारसमोर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आयुष्मान भारत डिजिटल मिशनमुळे देशात उपचार मिळणे आणि देणे या दोन्ही गोष्टी अगदी सोप्या होणार आहेत. एवढेच नाही तर भारताच्या दर्जेदार आणि परवडणाऱया आरोग्य सेवा प्रणालीमध्ये जागतिक स्तरावर प्रवेश सुकर होईल, असे पंतप्रधानांनी सांगितले. तसेच आयुर्वेदाची महती विषद करताना त्यांनी याचा आधार घेण्याची सवय लोकांमध्ये वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. आजही संपूर्ण जग ‘आयुष’ची भूमिका स्वीकारत आहे. याचे बरेचसे श्रेय भारतातील आयुर्वेद तज्ञांना असल्याचेही पंतप्रधानांनी अभिमानाने नमूद केले.
लसीकरण मोहिमेबद्दल अभिनंदन
जगातील सर्वात मोठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम यशस्वीपणे राबवल्याबद्दल 130 कोटी देशवासियांचे पंतप्रधानांनी अभिनंदन केले. स्वच्छ भारत मिशन, फिट इंडिया मिशन, पोषण योजना, मिशन इंद्रधनुष, आयुष्मान भारत, जल जीवन मिशन अशा सर्व योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचल्याबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले.
आरोग्य बजेटमध्ये मोठी वाढ
आरोग्य सेवांची मागणी जसजशी वाढत आहे, त्यानुसार आम्ही कुशल आरोग्य व्यावसायिक तयार करण्याचाही प्रयत्न करत आहोत. त्यामुळे आरोग्य शिक्षण आणि आरोग्य सेवेशी संबंधित मानव संसाधन विकासासाठीच्या अर्थसंकल्पात गेल्या वषीच्या तुलनेत मोठी वाढ करण्यात आली आहे. हा अर्थसंकल्प गेल्या 7 वर्षांत आरोग्य सेवा प्रणालीमध्ये सुधारणा आणि परिवर्तन करण्याच्या आमच्या प्रयत्नांचा विस्तार करतो, असे ते म्हणाले.