वार्ताहर / सांबरा
खेळामुळे शरीर बळकट बनते, रोगप्रतिकारशक्ती वाढते, निकोप शरीराची वाढ होते. आजच्या काळात अन्याय, अत्याचार वाढीला लागले आहेत. यासाठी कराटेसारख्या खेळामुळे स्वतःचे संरक्षण होऊ शकते. त्यासाठी प्रत्येकाने कराटे खेळाचे प्रशिक्षण घ्यावे, असे आवाहन हेल्पलाईन इमर्जन्सी रेस्यू फौंडेशनचे संचालक बसवराज हिरेमठ यांनी केले. ते मुचंडी येथे शोतोकन कराटे डू स्पोर्ट्स ऍकॅडमीचे उद्घाटन आणि बक्षीस वितरण समारंभप्रसंगी प्रमुख वक्ते या नात्याने बोलत होते. अध्यक्षस्थानी सिद्धेश्वर मंदिराचे ट्रस्टी मल्लाप्पा सुगणी होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शिवाजी मोटरे, वकील आनंद अष्टेकर, गजेंद्रसिंग ठाकुर, सुनील देशनूर, लक्ष्मण भातकांडे, शंकर देशनूर, महांतेश हलगीमर्डी आदी उपस्थित होते.
प्रारंभी भरमा मोटरे यांनी गणेश स्तवन तर स्वागतगीत मुलींनी म्हटले. पाहुण्यांचे स्वागत ऍकॅडमीचे संचालक लक्ष्मण नाईक यांनी केले. ऍड. आनंद अष्टेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. तर गजेंद्रसिंग ठाकुर यांच्या हस्ते गणेश फोटो पूजन करण्यात आले. त्यानंतर शिवाजी मोटरे यांच्या हस्ते फीत कापून शोतोकन कराटे डू स्पोर्ट्स ऍकॅडमीचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर कराटे स्पर्धेतील बक्षीस प्राप्त मुलांना सुवर्णपदक आणि पारितोषिक देऊन सन्मानित केले. तसेच सलग तीनवेळा राष्ट्रीय पातळीवर शिवानी चौगुले हिची निवड झाल्याबद्दल शाल व पुष्पगुच्छ देऊन संध्या मोटरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी श्रीकांत जोमणे, शंकर शिरोळे, सुनीता धामणेकर, मालू कोणो, लता धामणेकर, कराटे प्रशिक्षणार्थी, नागरिक तसेच कराटे स्पर्धक उपस्थित होते. सूत्रसंचालन पुंडलिक कुंडेकर यांनी केले.