सोयाबीन, शेगतेल व मोहरी तेलाचा साठा शिल्लकच
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
स्वस्त खाद्यतेलाच्या वाढत्या आयातीच्या काळात स्थानिक तेल बाजारात तेल दरांना फटका बसल्याचे दिसत आहे. यामध्ये मोहरी, शेंगातेल, सोयाबीन आदी तेलाचा समावेश आहे. मलेशिया आणि इंडोनेशियामध्ये पामतेलाचे उत्पादन जास्त झाल्याने जागतिक बाजारात त्याची किंमत घटली आहे. परिणामी, भारतातही तेलाचे दर कमी झाले आहेत, अशी माहिती आहे.
देशामधील शेतकऱयांसोबत सहकारी संस्था नाफेडजवळ मोहरी आणि शेंगातेलचा साठा शिल्लक राहिल्याची माहिती आहे. यासोबत शेतकऱयांकडे सोयाबीनसह शेंगतेल आणि सुर्यफूल तेलाचा मागील वर्षातील साठा काही प्रमाणात शिल्लक असल्याचे सांगण्यात येत असून तो यंदा विक्रीला येणार आहे.
आयातीमधील तेलांच्या तुलनेत या देशी तेलाच्या किमती जास्त असल्याने हे तेल महाग मिळत होते. त्यामुळे तेलाची किरकोळ बाजारातील विक्री कमी प्रमाणात होत आहे. वायदा व्यवहारात मनमानी कमी भाव बोलले जात असल्याने शेतकरी आपली पिके विकत नाहीत. दुसऱया बाजूला स्वस्त आयातीचे तेल उपलब्ध होत असल्याने यांची विक्री जोर धरत असल्याची माहिती आहे. अशा प्रकारे तेल व्यवहारात एक असमतोल निर्माण झाल्याचेही पहावयास मिळत आहे.
उत्पादनाचा उठाव स्थिर
मंडईमध्ये तेलाचे भाव कमी बोलले जात असल्याने सामान्यपातळीवर शेतकऱयांकडे प्रत्येक वर्षाला होणाऱया उत्पादनाचा जवळपास 25 टक्के भाग शिल्लक राहत आहे. पण हे तेल अधिक प्रमाणात साठविता न आल्याने मंडईबाहेर ते अर्ध्या किमतीला विकण्याची वेळही काही शेतकऱयांवर आली आहे. परिणामी, तेलदर निश्चित करणारी एक मध्यवर्ती यंत्रणा असावी, अशी मागणी होत आहे.