बेळगाव : येथील छत्रपती शिवाजी उड्डाण पुलानजीक असलेल्या एका मंगल कार्यालयात स्वागत समारंभासाठी गेलेल्या महिलेच्या बॅगमधील दागिने चोरटय़ांनी लांबविल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली आहे. मार्केट पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
जुन्या पी. बी. रोडवरील एका मंगल कार्यालयात शुक्रवारी रात्री स्वागत समारंभ होता. त्यावेळी ताशिलदार गल्ली येथील शालन जुवेकर यांच्या बॅगेतून 25 ग्रॅम सोन्याचे दागिने व 35 हजार रुपये रोख रक्कम चोरटय़ांनी पळविल्याचे उघडकीस आले आहे.
शनिवारी यासंबंधी मार्केट पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक मल्लिकार्जुन तुळशीगेरी, उपनिरीक्षक विठ्ठल हावण्णावर पुढील तपास करीत आहेत. सीसीटीव्ही फुटेजवरून या चोरी प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.