अग्रमानांकित हॅलेप, किकी बर्टेन्स, ओस्टापेन्कोचे धक्कादायक पराभव, जोकोविच, क्विटोव्हा, जेबॉर चौथ्या फेरीत
वृत्तसंस्था/ पॅरिस
पोलंडची युवा खेळाडू इगा स्वायटेकने रविवारी धक्कादायक निकाल नोंदवताना अग्रमानांकित सिमोना हॅलेपचे आव्हान संपुष्टात आणत प्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळविले आहे. अशीच कामगिरी इटलीच्या मार्टिना ट्रेविसनने केली असून तिने पाचव्या मानांकित किकी बर्टेन्सला स्पर्धेबाहेर घालविले. याशिवाय माजी कनिष्ठ विजेत्या स्पेनच्या पॉला बडोसाने माजी विजेत्या एलेना ओस्टापेन्कोला धक्का देत चौथी फेरी गाठली आहे. पुरुष एकेरीत नदालने उपांत्यपूर्व तर नोव्हॅक जोकोविच शेवटच्या सोळांमध्ये स्थान मिळविले आहे. क्विटोव्हा, ओन्स जेबॉर, फिओना फेरो यांनीही आगेकूच केली आहे.
हॅलेपने सलग 17 सामने जिंकत चौथ्या फेरीत स्थान मिळविले होते. पण तिची ही घोडदौड 19 वर्षीय स्वायटेकने रोखताना केवळ 45 मिनिटांच्या खेळात 6-1, 6-2 असा तिचा धुव्वा उडविला. गेल्या वर्षी याच स्पर्धेत याच फेरीत हॅलेपने तिचा एकतर्फी पराभव केला होता, त्याची परतफेडही स्वायटेकने यावेळी केली. हॅलेप प्राग व रोममधील स्पर्धा जिंकून या स्पर्धेत उतरली होती. पात्रता फेरीतून आलेल्या इटलीच्या ट्रेविसनने हॉलंडच्या किकी बर्टेन्सचा 6-4, 6-4 असा पराभव केला. स्वायटेक व ट्रेविसन यांच्यात पुढील लढत होईल. अन्य एका सामन्यात माजी चॅम्पियन ओस्टापेन्कोला कनिष्ठ गटाची माजी विजेती पॉला बडोसाने 6-4, 6-3 असा पराभवाचा धक्का देत चौथी फेरी गाठली. तिची लढत लॉरा सीगमंडशी होईल.
टय़ुनिशियाची जेबॉर ही पेंच ओपन स्पर्धेची चौथी गाठणारी अरबची पहिली महिला बनली आहे. तिने आठव्या मानांकित ऍरीना साबालेन्काचा संघर्षपूर्ण लढतीत 7-6 (9-7), 2-6, 6-3 असा पराभव केला. यापूर्वी 2017 मध्ये तिने या स्पर्धेत तिसऱया फेरीपर्यंत मजल मारली होती. फ्रान्सच्या फिओना फेरोनेही शेवटच्या सोळांमध्ये स्थान मिळविताना रोमानियाच्या पॅट्रिसिया मारिया टिगवर 7-6 (9-7), 4-6, 6-0 अशी मात केली. फेरोचा हा टूरवरील सलग आठवा विजय आहे. तिची लढत अमेरिकेच्या चौथ्या मानांकित सोफिया केनिनशी होणार आहे. केनिनने रोमानियाच्या इरिना बाराचा 6-2, 6-0 असा फडशा पाडला. फ्रान्सची आणखी एक युवा खेळाडू क्लारा बुरेलला मात्र चीनच्या झँग शुआईने 7-6 (7-2), 7-5 असे हरवित चौथ्या फेरीत स्थान मिळविले. पेत्रा क्विटोव्हानेही या स्पर्धेची पाचव्यांदा चौथी फेरी गाठली आहे. मात्र तिला विजयासाठी संघर्ष करावा लागला. तिने लेलाह फर्नांडिजचा 7-5, 6-3 असा पराभव केला. झँगशी तिची पुढील लढत होईल.
पुरुष एकेरीत स्पेनच्या राफेल नदालने पात्रता फेरीतून आलेल्या अमेरिकेच्या 20 वर्षीय सेबॅस्टियन कोर्दाचा 6-1, 6-1, 6-2 असा सहज पराभव करून येथे 13 व्या जेतेपदाच्या दिशेने आगेकूच केली. अन्य एका सामन्यात अग्रमानांकित जोकोविचने सलग 11 व्या वर्षी या स्पर्धेच्या शेवटच्या सोळांमध्ये स्थान मिळविले असून त्याने कोलंबियाच्या डॅनियल गॅलनचा 6-0, 6-2, 6-3 असा फडशा पाडला. त्याची लढत रशियाच्या कॅरेन खचानोव्हशी होणार आहे.