ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू-काश्मीरच्या हंडवारा परिसरात भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात लष्करी जवानांना यश आले. या हल्ल्यात लष्कराच्या दोन अधिकाऱ्यांसह पाच जण शहीद झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरच्या हंडवारा परिसरात एका घरात बंदिस्त असलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी 21 राष्ट्रीय रायफाल्सचे जवान गेले होते. यावेळी तिथे दबा धरून बसलेल्या दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार केला. या गोळीबाराला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले. या हल्ल्यात लष्कराच्या दोन अधिकाऱ्यांसह पाच जण शहीद झाले. शहिदांमध्ये एक कर्नल, एक मेजर, लष्कराचे दोन जवान आणि जम्मू-कश्मीर पोलीस खात्यातील एका उपनिरीक्षकाचा समावेश आहे.
हंडवारा परिसरातील गोळीबार सध्या थांबला असून, भारतीय जवानांनी परिसराला घेराव घातला आहे. परिसरात सध्या नाकाबंदी करण्यात आली असून, दहशवाद्यांचा शोध घेण्यात येत आहे.