प्रतिनिधी/ सातारा
ज्यांना स्वतःचे घर नव्हते. ती मंडळी शासकीय जागेत कुडामेडाच्या छप्परात अतिक्रमण करुन रहात होती. आपले हक्काचे घर होईल की नाही हे त्यांना स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते. मात्र, शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेतून फलटण तालुक्यातील हणंमतवाडीत प्रशासनाच्या सहकार्याने जिह्यातील ज्यांना जागाच नव्हती अशा 24 जणांसाठी घरकुल साकारले आहे. तात्कालिन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी मुहूर्तमेढ रोवली होती. तेव्हापासून विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या कार्यकाळात पुर्ण झाले आहे.
प्रत्येकालाच असावे वाटते हक्काचे घर. घर बांधण्याकरिता मोठा खर्च येतो. स्वतःची जागा असावी लागते. परंतु स्वतःची जागा नसणाऱयांना घर कसे मिळणार. शासकीय जागेत कुडामेडाच्या शेडात रहाणाऱयांसाठी पंतप्रधान आवास योजना आली. त्याच योजनेतून ज्यांना घरे नाहीत. त्यांच्यासाठी घरे देण्यासाठी तात्कालिन मुख्य कार्यकारी डॉ. कैलास शिंदे यांनी प्रस्ताव मागवून घेतले. कागदपत्रांची मागणी करुन शासकीय जागा फलटण तालुक्यातील हणुमानवाडी येथे गट नंबर 366 मध्ये 1 हेक्टर 86 आर या जागेत घरकुले उभी करण्याच्या कामास प्रारंभ झाला तो दि. 10 जून 2019 ला. रोजगार हमी योजनेतून लाभार्थ्यांनी ही घरे बांधून घेतले. प्रत्येकास पाचशे चौरस फुट जागा खरेदी करुन देण्यात आली. त्यामध्ये 275 चौरस फुटामध्ये शौचालयासह घर बांधून देण्यात आले. त्याकरिता या कामासाठी नरेगा अंतर्गत अकुशल 18 हजार 270 रुपये व प्रधानमंत्री रमाई आवास योजनेतंर्गत 1 लाख 20 हजार रुपये व वैयक्तिक शौचालयासाठी 12 हजार असे एकूण 36 लाख 6 हजार 480 इतका निधी खर्च करण्यात आला. त्यांना हक्काचे घर मिळाले ते विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या कार्यकाळात.
योजनेमुळे लाभार्थ्यांना घर देता आले
ग्रामपंचायत हणमंतवाडी येथील विविध समाजातील लाभार्थींना जागा उपलब्ध नव्हती. हे लाभार्थी हे मोलमजूरी करुन उदरनिर्वाह करत होते. त्यांना राहण्यासाठी कच्चे घर असून शासकीय जागेत अतिक्रमण करुन रहात होते. त्यांच्या जीवनात पक्के घर ही कल्पनाच अस्तित्वात नव्हती. त्यांचा मुख्य व्यवसाय मोलमजूरी आणि त्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे, त्यांना कुठेतरी पक्के घर मिळावे याकरीता शासनाच्या विविध योजनेमार्फत प्रयत्न केले जातात. त्यातीलच एक प्रयत्न म्हणजे ग्रामपंचायत हणमंतवाडी येथे प्रधानमंत्री, रमाई आवास योजनेतंर्गत बांधण्यात आलेली घरकुले.